शहरात होणार 50 हजार वृक्षांची लागवड...!

 0
शहरात होणार 50 हजार वृक्षांची लागवड...!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 ते 29 जुलै दरम्यान विशेष वृक्षारोपण अभियान

वृक्षसंवर्धनासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप व एसओपी तयार करणार – महापौर समीर राजूरकर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे 22 ते 29 जुलै 2026 या कालावधीत शहरभर विशेष वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत महानगरपालिकेला सन 2026 मध्ये 50 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील विविध ठिकाणी 16 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस माजी आमदार संजय केणेकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता संजय कोंबडे, उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, मुख्य उद्यान अधिकारी डॉ. विजय पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भामरे, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील सार्वजनिक उद्याने, झुलॉजिकल पार्क, स्मशानभूमी परिसर, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, महानगरपालिका शाळा, विविध आरोग्य केंद्रे, रस्त्यांचे दुभाजक, हरितपट्टे आणि उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी आवश्यक खड्डे खोदणे, दर्जेदार रोपांची उपलब्धता, सिंचन व्यवस्था तसेच वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी महापौर समीर राजूरकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या उद्दिष्टपूर्तीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रभावीपणे योगदान देणार असून, वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनालाही तितकेच महत्त्व दिले जाईल.

महापौरांनी प्रत्येक लागवड केलेल्या वृक्षाची जबाबदारी संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा इच्छुक नागरिकांकडे निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रत्येक वृक्षाची लागवडीची तारीख, प्रजाती, वाढीची स्थिती आणि जबाबदार व्यक्तीची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप/सॉफ्टवेअर विकसित करण्याचे निर्देश दिले.

याशिवाय वृक्षारोपणासाठी प्रमाणित स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करण्याचे निर्देश देत दोन झाडांमधील अंतर, खड्ड्यांचा आकार, तसेच रस्त्यालगत, दुभाजक, बॉण्ड्री वॉल, पार्किंग, उद्याने आणि इतर विविध ठिकाणांसाठी कोणत्या प्रजातीची झाडे योग्य राहतील याबाबत सविस्तर मार्गदर्शिका तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महापौरांनी वृक्षारोपण ही केवळ मोहीम न राहता ती पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनावी, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन केले.

महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनीही अभियान यशस्वी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. वृक्ष लागवड करताना जागेच्या स्वरूपानुसार योग्य प्रजातींची निवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मैदान, रस्त्याच्या कडेला, शाळा, उद्याने किंवा पार्किंग परिसरात त्या-त्या ठिकाणासाठी उपयुक्त वृक्षांची निवड करावी. विशेषतः पार्किंग परिसरात अधिक सावली देणाऱ्या वृक्षांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow