शहरातील आठवडी बाजार बंद होणार नाही, मनपाचे स्पष्टीकरण, हाॅकर्स यांना दिलासा...
पथविक्रेत्यांच्या हिताचा विजय...! आठवडी बाजार बंद करण्याचे कोणतेही धोरण नाही; मनपाचे लेखी स्पष्टीकरण
छत्रपती संभाजीनगर, दि.10(डि-24 न्यूज)- शहरातील हजारो पथविक्रेते, फेरीवाले, लघु व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील आठवडी बाजार बंद करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला असून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले आहे की, सद्यस्थितीत आठवडी बाजार बंद करण्याबाबत कोणतेही धोरण ठरविण्यात आलेले नाही तसेच शहरातील सर्व आठवडी बाजार नियमितपणे सुरू आहेत.
वेलकम शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे सचिव अँड. अझर पठाण यांनी दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून आठवडी बाजार बंद करण्याऐवजी त्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याची मागणी केली होती. या संदर्भात तत्कालीन आयुक्त श्रीकांत सर, नवनियुक्त आयुक्त विकास येडगे, महापौर तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी निवेदन व प्रत्यक्ष भेटी घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
निवेदनात शहरातील पथविक्रेत्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली होती. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत शहरातील तब्बल 59,134 पथविक्रेत्यांना 86.84 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह आठवडी बाजार व रस्त्यावरील छोट्या व्यवसायांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत बाजार बंद झाल्यास अनेक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवून कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.
तसेच केंद्र सरकारच्या पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री नियमन) अधिनियम 2014 अंतर्गत पथविक्रेत्यांना कायदेशीर संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. संपूर्ण सर्वेक्षण, टाउन व्हेंडिंग कमिटीची प्रक्रिया आणि पर्यायी व्हेंडिंग झोन उपलब्ध न करून देता कोणत्याही पथविक्रेत्याला व्यवसायापासून वंचित करता येत नाही, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
अँड. अझर पठाण यांनी प्रशासनासमोर मांडलेल्या सूचनांमध्ये बाजार बंद करण्याऐवजी शहरातील वाहतूक, स्वच्छता आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी पुढील उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या –
प्रत्येक प्रभागात नियोजित हॉकर्स झोनची निर्मिती, पथविक्रेत्यांचे नव्याने बायोमेट्रिक सर्वेक्षण,
QR कोड आधारित डिजिटल ओळखपत्रे, आठवडी बाजार परिसरात पार्किंग व्यवस्था,
मोबाईल टॉयलेट्स व स्वच्छता सुविधा, वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र आराखडा, पथविक्रेता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने दिनांक 10 जून 2026 रोजी अधिकृत पत्राद्वारे आठवडी बाजार बंद करण्याबाबत कोणतेही धोरण नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरातील हजारो पथविक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून रोजगार टिकून राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याप्रसंगी अँड. अझर पठाण यांनी मनपा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, महापौर आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच शहराच्या विकासाला गती देतानाच पथविक्रेत्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे स्वतंत्र आणि आधुनिक पथविक्रेता धोरण तातडीने लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा केली.
"आठवडी बाजार बंद करणे हा उपाय नाही; योग्य नियोजन, कायदेशीर संरक्षण आणि आधुनिक व्यवस्थापन हाच शाश्वत मार्ग आहे. शहराचा विकास आणि पथविक्रेत्यांचा रोजगार हे दोन्ही एकत्र जपले गेले पाहिजेत."
अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे अँड. अझर पठाण
सचिव, वेलकम शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्था यांनी दिली आहे.
What's Your Reaction?