संविधान जागर अभियानातून स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण - उपराष्ट्रपती जगदीप धनगड

संविधान जागर अभियानातून स्वातंत्र्यासाठी
दिलेल्या बलिदानाचे स्मरण- उपराष्ट्रपती जगदीप धनखड
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.22 (डि-24 न्यूज)- स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण संविधान जागर अभियानातून करावे. हा संविधान जागर तरुण पिढीमध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्याचे जाणीव करून देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल,असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरस्वती भुवन या शिक्षण संस्थेत आज केले.
‘जागर संविधान संविधानाचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याहस्ते करण्यात आले. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकील, सचिव श्रीरंग देशपांडे यांच्यासह विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले, क्रांतीकारकांनी केलेल्या बलिदानाचे सार्थक देशाच्या स्वातंत्र्यात झाले. विविध क्षेत्रातील धुरीणांनी भारतीय संविधान निर्मितीचे महान कार्य केले. संवाद समन्वय, सामंजस्य, संभाषण यातून आपले प्रजासत्ताक निर्माण झाले. देशात शांततापूर्ण वातावरण राखण्यात राष्ट्रहित असून प्रजासत्ताक स्थापनेचा हाच मूळ उद्देश आहे. म्हणूनच प्रत्येक नागरिकांनी भारतीय संविधानाप्रति आदर ठेवून देशात मूलभूत हक्कांबरोबरच कर्तव्य पार पाडणे आवश्यक असल्याचे श्री. धनखड यांनी सांगितले. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क नागरिकांनी जागरुकपणे बजावला पाहिजे. यातून लोकप्रतिनिधीची निवड होत असते. आपण भारतीय असल्याची ओळख लोकशाही राज्यव्यवस्था ही संविधानाने दिलेली देणगी असून प्रत्येक भारतीयांनी राष्ट्रहित प्रथम मानून कर्तव्य बजवावे. संविधान जागर अभियान राष्ट्रवादाला प्रज्वलित करणारे ठरेल असेही श्री. धनखड यांनी सांगितले.
याप्रसंगी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या आवारात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यांच्या पत्नी सुदेश धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण यांनी ‘एक पेड मा के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण केले. प्रास्ताविक दिनेश वकील यांनी केले.
What's Your Reaction?






