सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण स्वतःहुन काढून टाकण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन...

 0
सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण स्वतःहुन काढून टाकण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन...

सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण स्वयंहून काढून टाकण्याचे नागरिकांना आवाहन... महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांचा इशारा 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 26(डि-24 न्यूज)

 शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणे आणि सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवणे यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. या अनुषंगाने, मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी 24 जून 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेने शहरातील बीड बायपास, पैठण रोड आणि जालना रोड या महत्त्वाच्या रस्त्यांवरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतली आहे.

या कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, नागरी सुविधा अबाधित राहाव्यात यासाठी महानगरपालिका विशेष दक्षता घेत आहे. सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, यामुळे अपघातांची शक्यता वाढते, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि सामान्य नागरिकांचे मोठे हाल होतात.

या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. जी. श्रीकांत यांनी नागरिकांना स्पष्टपणे सूचित केले आहे की, वरील नमूद तिन्ही रस्त्यांवरील सर्व्हिस रोडवर ज्यांच्याकडे अतिक्रमण स्वरूपातील मिळकती आहेत, त्यांनी त्वरित हे अतिक्रमण स्वतःहून काढून टाकावे. अन्यथा महानगरपालिकेमार्फत अशा अनधिकृत अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि अतिक्रमित भाग पाडण्यात येईल.

या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका नियोजित पद्धतीने सर्व्हेक्षण देखील राबवणार असून, संबंधित भागातील सर्व मिळकतींचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केले जाईल. नागरिकांनी जर बांधकाम परवाना घेतलेला असेल, तर त्याचे वैध दस्तऐवज महानगरपालिकेस सादर करावेत. अन्यथा, संबंधित मिळकतींची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या गुंठेवारी योजनेअंतर्गत नियमित करून घ्याव्यात.

अतिक्रमण स्वरूपातील मिळकतींबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर न झाल्यास, अशा मिळकतींना महानगरपालिका अनधिकृत म्हणून घोषित करेल व त्यावर थेट पाडकामाची कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेत योग्य ती माहिती सादर करून, कारवाई टाळावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक यांनी केले आहे.

या मोहिमेमुळे सार्वजनिक रस्त्यांची मोकळीक, स्वच्छता, वाहतुकीची सुलभता आणि नागरी सोयी-सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील. त्यामुळे ही कारवाई नागरिकांच्या हितासाठीच असून, सर्वांनी महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करावे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow