हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडा अन्यथा पश्चिम महाराष्ट्रात जाणारा उस रोखणार- सतीश घाटगे

 0
हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडा अन्यथा पश्चिम महाराष्ट्रात जाणारा उस रोखणार- सतीश घाटगे

हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडा, अन्यथा पश्चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस रोखणार- सतीश घाटगे

घनसावंगी,दि.18(डि-24 न्यूज) पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक जिल्हातील धरणात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविण्यात आले आहे. आदेश देऊनही जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत नाही. या विरोधात समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपाचे सतीश घाटगे यांनी आता आक्रमक भूमिका घेत पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यात मराठवाड्यातून जाणारा ऊस रोखण्याचा इशारा दिला आहे. 

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात पाण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेलाही सतीश घाटगे आव्हान देणार आहे.

 समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार मराठवाड्याच्या हक्काचं 8.608 टीएमसी पाणी आदेश देऊनही सोडण्यात आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक भागातील नेत्यांच्या दबावामुळे हे पाणी अडविण्यात आलेले आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.

 मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याला विरोध करत पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या विरोधात समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 11 नोव्हेंबर रोजी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी जनआंदोलन केले. त्यानंतरही सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याने शनिवारी सतीश घाटगे यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच सरकारला पाणी सोडण्यास भाग पाडण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना धडा शिकविण्यासाठी मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारा 12 लाख मेट्रिक टन ऊस रोखण्याचा इशारा सतीश घाटगे यांनी दिला आहे.

प्रत्येकवेळी मराठवाड्याच्या हक्काच पाणी भांडून घ्यावे लागत आहे. परंतु,आता यापुढे अशी वेळ मराठवाड्यातील जनतेवर येऊ नये, म्हणून हक्काच्या पाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला आव्हान देणार आहे. सरकारने मराठवाड्याच्या पाण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी , सध्या मराठवाडा दुष्काळी परिस्थितीतून जात आहे. शेती आणि पिण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील नेते पाणी अडवत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. मराठवाड्याचे हक्काचे पाणी जायकवाडीत न सोडल्यास पश्चिम महाराष्ट्रात जाणारा 12 लाख मेट्रिक टन ऊस आम्ही अडवणार आहोत. अशी माहिती त्यांनी डि-24 न्यूजला दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow