अद्रकचे भरघोस उत्पादन घेऊन शेती करणारे तरुण शेतकरी संतोष लालगिर गिरी
 
                                कृषी यशोगाथा... (राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त)
अद्रक चे भरघोस उत्पादन घेऊन शेती करणारे तरुण शेतकरी संतोष लालगिर गिरी
नियोजनबद्ध लागवड केल्यास अद्रकची शेती फायदेशीर
पैठण, दि.23(डि-24 न्यूज) शेती म्हणजे माती नसते तर शेती म्हणजे सोने आहे. म्हणूनच शेती हि विकायची नसते तर शेती राखायची असते. आणि राखून ती मेहनतीने कसायची असते. शेती म्हणजे आपली आई आहे. नवरदेव बीएस्सी अग्री या मराठी चित्रपटातील हे संवाद तंतोतंत आपल्या प्रत्यक्ष कृतीत उतरवून सिद्ध करून दाखवणारे निंभोरा, ता. कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील तरुण शेतकरी संतोष लालगिर गिरी यांनी याच शेतीला ब्रांड करून दाखवले. शेती करण्याची इच्छा, उमेद आणि आवड असली की जगात कुठेही जाऊन शेती करता येते असे आजच्या पिढीतील तरुणांना सांगत प्रामाणिक भावना तरुण शेतकरी संतोष लालगिर गिरी यांनी व्यक्त केली. प्रत्येक तरुण शेतकऱ्याला आपल्या शेती उत्पादनात प्रचंड यश मिळवून देत आर्थिक बाजूने स्वावलंबी बनविणारे संतोष गिरी यांची यशोगाथा प्रत्येकाला प्रेरणा आणि उर्जा देणारीच ठरेल याचा आत्मविश्वास याठिकाणी व्यक्त होतो.
बीएस्सी कॉम्पुटर सायन्स ही पदवी घेतली. चांगली नौकरी लागावी म्हणुन मी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. मात्र कोरोना च्या महामारी मुळे मला ते शक्य झाले नाही. पुढे आपण काहीतरी करायला पाहिजे हे मनोमन वाटत होते म्हणून कृषी क्षेत्रातील डिप्लोमा केला व पूर्ण वेळ आपण हा शेतीसाठीच द्यायला हवा असा निर्धार केला. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या लोहगाव येथे पिकांसाठी पोषक असलेले वातावरण, माती तसेच हवामानाचे परीक्षण केले. 1 वर्षासाठी लीजवर 6 एकर जमीन संतोष लालगिर गिरी यांनी घेतली. दररोज 130 किलोमीटर दुचाकी वर जात 6 एकरातील विविध जागेत आले म्हणजेच अद्रकचे पिक 2024 मध्ये घेण्याचे ठरवून अद्रकची नियोजनबद्ध लागवड केली. चांगली जमीन आणि वर्षभरात अद्रक पिकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. पिकांची देखरेख, औषध फवारणी, खत यासह आवश्यक असलेले पाणी, हवामान यावर अभ्यास करून त्याचे नियोजन केले. वेळोवेळी पिकांची देखरेख आणि योग्य नियोजन केल्याने आज चांगल्या दर्जाची अद्रक बियाणे साठी सज्ज केली आहे. मागील वर्षात मला अद्रक बियाणांच्या 100 क्विंटल लागवडीत एकरी 10 ते 12 लाख रुपयांचा फायदा झाला. आणि यामुळे मला आत्मविश्वास आल्याने मी पुन्हा अद्रकच्या पिकांची बियाणांसाठी लागवड केली.
सतत बाजार पेठेतील बदलत्या शेतीमालाच्या भावामुळे प्रत्येकवेळी आर्थिक फायदा होईलच असे नाही. कधी कधी खुप मोठे नुकसान पण होते. मात्र जर आपण चांगल्या दर्जाचे कोणतेही पिक घेतल्यास आणि त्याचे नियोजन केल्यास आपल्या शेतीतील उत्पादनाला चांगला फायदा नक्कीच होतो. म्हणून मी अगोदर फक्त चांगल्या दर्जाच्या बियाणांसाठीच अद्रक पिकाची लागवड केली. अद्रक चेच उत्पादन का ? या प्रश्नाला उत्तर देतांना संतोष गिरी म्हणाले की, अद्रकची लागवड ही वडील सुरुवातीपासून करायचे त्यांनी शेतीत केलेले काम मी लहानपणा पासून पाहत आलो. त्यामुळे हा प्रत्यक्षात अनुभव होताच. बीएस्सी कॉम्पुटर सायन्स ही पदवी घेऊन मी माझे शिक्षण पूर्ण केले. मात्र यात आणखी काहीतरी वेगळे करावे असे मला सातत्याने वाटत असल्याने मी कृषी क्षेत्रातील डिप्लोमा पूर्ण केला. त्यामुळे अद्रकचे उत्पादन घेण्यासाठी माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. सुरुवातीला अद्रकचे बियाणे निर्मितीसाठी मी अद्रक पिकाला प्राधान्य दिले. अद्रक चे पिक घेतल्यास याचा फायदा इतर शेतकऱ्यालाही व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. म्हणून पैठण तालुक्यातील लोहगाव येथील नवनाथ शिंदे आणि रमेश कदम यांच्या सहकार्याने एकरी 60 क्विंटल अद्रक बियाणांसाठी लागवड केली. 2023 मध्ये रमेश कदम यांनी संतोष गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली 9 महिन्यामध्ये एकरी 238 उत्पादन घेतले पूर्ण 2.5 एकरातील 550 क्विंटल अद्रक ही 11,500 रुपये प्रति कुंटल प्रमाणे बियानासाठी गेली त्यातून त्यांना चांगला आर्थिक नफा झाल्याने 2023 मध्ये संतोष गिरी यांना लोहगाव येथेच अद्रक लावण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे ओळखून रमेश कदम यांच्या मामाची 6 एकर जमीन करारावर घेतली.
माझ्या मित्रांकडून मला प्रेरणा...
पैठण तालुक्यात कापूस आणि मोसंबी हे उत्पादन असतानाही मी अद्रक चे उत्पादन घेतले. 2020 मध्ये माझे मित्र पैठण तालुक्यातील लोहगाव येथील नवनाथ शिंदे आणि रमेश कदम यांनी अद्रक ची लागवड केली होती. माझा आले उत्पादक महाराष्ट्र राज्य असा एक सोशल माध्यमावर ग्रुप आहे. सोशल माध्यमावर मी विविध पोस्ट टाकतो. या दोघांनीही अद्रकची लागवड केली होती. त्यानुसार त्यांचा माझा संपर्क झाला. माझे नियोजन त्यांना आवडले म्हणून त्यांनी मला संपर्क साधत त्यांनी 2022 मध्ये रमेश कदम यांनी त्यांच्या मामाची जमीन मला लीजवर देऊन मला पाहिजे ती मदत त्यांनी केली. मग माझा मित्र समीर याच्या साह्याने मी संपूर्ण शेत जमिनीची मशागत किली. आणि अद्रक पिकाचे भरघोस उत्पादन घेतले.
रोजगार निर्मितीसाठी मित्रांना घेऊन शेतीत विविध प्रयोग करण्याचा मानस...
भविष्यात संतोष गिरी हे त्यांच्या मित्रांना सहकार्याने विविध पिके घेऊन शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करू इच्छितात. शेतमालाला नेहमीच पाहिजे तेवढा भाव मिळत नाही म्हणून शेतात पिकविलेला कच्चा मालापासून बाय प्रॉडक्ट बनवून स्थानिक बाजार पेठेत किंवा इतर देशात विक्री करणार. यातून रोजगार सुद्धा निर्माण होतील. यासाठी त्यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी ग्रुपने येऊन एकमेकांना सहकार्य करून शेती केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते.
सड हा मुख्य रोग असल्याने अद्रक हे आव्हानात्मक पिक...
सड हा मुख्य रोग आहे. त्याचबरोबर पाणी, पाउस, तसेच जमिनीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अद्रक हे आव्हानात्मक पिक आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. थोडेही दुर्लक्ष झाल्यास करपा रोग, सड लागणे, मुळाचे रोग, असे विविध रोगांची लागण पिकांना होऊ शकते. अद्रक या पिकावर जडलेले रोग हे लवकर नियंत्रणात येत नाही. त्यामुळे वेळीच काळजी घेतल्यास आपण घेतलेल्या कोणत्याही उत्पादनांना जीवदान देऊ शकतो.
कोणतेही पिक घ्या पण मनापासून घ्या.... पिकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही...
माझे तरुण शेतकऱ्याना एवढेच सांगणे आहे की, आपल्या शेतामध्ये कोतेही पिक घ्या, पण ते मनापासून घ्या. पूर्णपणे आपण शेती मध्ये झोकून दिले पाहिजे. पिकांना जीवदान देत निरोगी ठेवण्यासाठी पिकांची काळजी घेणे आवश्यकच आहे. असे नाही कि घेतले आणि सोडून दिले. 24 तास आपण आपल्या शेतीमध्ये घेतलेल्या कोणत्याही पिकांकडे देखरेख करणे गरजेचेच आहे.
तरुण शेतकरी संतोष लालगिर गिरी
निंभोरा, ता. कन्नड, जिल्हा छत्र
 
 
पती संभाजीनगर(औरंगाबाद)
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            