अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा भाजपा व आरएसएसवर गंभीर आरोप
'आरएसएस' चे मुख्य प्रवक्ते राम माधव यांची पाकिस्तानच्या 'आयएसआय'सोबत श्रीलंकेत चर्चा...
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्ीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा गंभीर आरोप...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य प्रवक्ते राम माधव यांची पाकिस्तानती गुप्तचर संघटना 'आयएसआय'सोबत श्रीलंकेतील कोलंबो येथे तीन दिवस गुप्त चर्चा झाली असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. नेमक्या कोणत्या मुद्यांवर ही चर्चा झाली याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील जनतेसमोर करावा, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या सुनावणीसाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर शुक्रवारी शहरात आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी पुढे बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, आयएसआयचे माजी प्रमुख पतौडी आणि इतर लोकांसोबत राम माधव यांच्याशी चार मुद्यांवर चर्चा झाली असल्याची खात्रीलायक माहिती आपल्याला मिळाली आहे. चर्चा कोणत्या मुद्यांवर झाली याचा खुलासा मोहन भागवत यांनी केला पाहिजे. तसेच मनकी बात सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केला पाहिजे. हा मुद्दा परराष्ट्र धोरणाशी संबंधित असल्याने आयएसआयच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी राम माधव यांना अधिकार दिला होता का, याचा खुलासाही मोदी यांनी करावा, अशी मागणीही त्यांनी केली. भाजप एकीकडे मुस्लीमांना कोणत्याच निवडणुकीत तिकीट देत नाही. पुलवामाचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर केले. पाकिस्तानला धडा शिकविला जाईल, असे सांगत असताना दुसरीकडे आतंकवाद्यांना संरक्षण देणाऱ्या आयएसआयसोबत चर्चा करते यामागे काही तरी गंभीर स्वरुपाचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी ही चर्चा केली जात असेल तर ती खुल्यापणाने करावी आणि चर्चेतून काय निष्पन्न झाले, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, असेही ते म्हणाले. आरएसएस आणि पाकिस्तान या दोन्ही जुळ्या बहिणी असून दोघींनाही ब्रिटीशांनीच जन्माला घातले आहे, असेही ते म्हणाले. देशात अराजक माजविणाऱ्या आयएसआयसोबत आरएसएसचे प्रवक्ते चर्चा करतात हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांनी जनतेसमोर उपस्थित केला पाहिजे होता. परंतु वंचित बहुजन आघाडी सारख्या प्रादेशिक पक्षाला यावर आवाज उठवावा लागत आहे. देशातील जनता अद्यापही मंदिर, मस्जीद, गुरुद्वारा, चर्च, बौद्ध विहार यामध्येच अडकलेली आहे. धार्मिक स्थळ केवळ मन: शांती देऊ शकतात. मात्र, देशाच्या सुरक्षिततेचे आणि आर्थिक प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे भारतीय जनतेने यावर गंभीर चर्चा करावी. जेणेकरून देशाच्या भरकटत चालणाऱ्या राजकारणाला आळा बसेल, असेही ते म्हणाले.
भाजप जेव्हा जेव्हा सत्तेवर येते तेव्हा तेव्हा घोडचुका करते, असेही ते म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना चीनच्या दौऱ्यावर गेले. त्यावेळी भारत आणि चिनचा मित्र असणाऱ्या व्हीयतनामवरच हल्ला केला होता. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांना चिनचा दौरा अर्धवट सोडून यावे लागले होते. त्यावेळीही देशाची बदनामी झाली होती. तर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मुशरफ यांना चर्चेसाठी आग्ऱ्यात बोलविण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमकुवत होती. पाकिस्तानाच्या कर्जाला मुदतवाढ देण्यास अरब राष्ट्र तयार नव्हते. पाकिस्तान कोलमडून पडण्याची शक्यता असताना वाजपेयी यांनी चर्चेला बोलावून घेतल्याने अवळणाऱ्या आर्थिक नाड्या सैल झाल्या. त्याच वेळी भारतावर पाकिस्तानने कारगिल हल्ला केल्याचेही त्यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा भाजप अडचणीत येते त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या आयएसआयची आठवण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसने आपल्या कार्यालयांना टाळे ठोकावे...
आरएसएस आणि आयएसआय यांच्यात गुप्त चर्चा झाल्याचा मुद्दा आंतरराष्टीय पातळीवर फार महत्वाचा आहे. असे असतानाही हा मुद्दा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला महत्वाचा वाटत नाही. त्याची चर्चा जनेसमोर केली जात नाही. एवढेच नाही तर आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा जातीय द्वेषातून अवमान केला जातो, यावरही आंदोलन करावे वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसने आपल्या कार्यालयांना टाळे ठोकावे, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.
What's Your Reaction?