उध्दव सेनेच्या वतीने भगवा शौर्य दिनानिमित्त महाआरती...
शिवसेनेच्या वतीने भगवा शौर्य दिनानिमित्त महाआरती...
राम मंदिर निर्माण आंदोलनातील शहिदांना वाहिली आदरांजली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)-: भगवा शौर्य दिनानिमित्त शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज 6 डिसेंबर रोजी शहरातील गुलमंडी परिसरातील दुपारी हनुमान मंदिर येथे भजन व महाआरती करण्यात आली. राम मंदिर निर्माण आंदोलनातील शहिदांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत भक्तिपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक श्रीराम व मारुती रायाच्या गजरात भजनाने झाली. कीर्तनकार व भजन मंडळांनी राष्ट्रधर्म, शिवछत्रपतींचे पराक्रम, आणि भगव्या विचारांचे गौरवगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
महाआरतीत सर्व उपस्थितांनी सामूहिक सहभाग घेतला. पारंपरिक भजनांच्या गजरात व शंखनादात आरती पार पडताच संपूर्ण परिसरात भक्तिभाव व एकजुटीचा उत्साह पसरला.
भगवा शौर्याचा जागर, श्रीराम भक्तीचा गौरव आणि हिंदुत्वाचा अभिमान ज्वलंत करण्यासाठी तसेच राम मंदिर निर्माण आंदोलनातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी या आरतीचे आयोजन करण्यात आल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले.
भगवा शौर्य दिन हा आपला अभिमानाचा दिवस असून शिवचरित्र, हिंदू संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. समाजातील ऐक्य, बंधुता आणि शिवसेनेच्या विचारांची जपणूक हीच खरी सेवा असल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले.
कार्यक्रमात महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. भजन व महाआरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, महानगरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, महिला आघाडी संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सुनीता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले व शहर संघटक सुनीता सोनवणे उपस्थित होते.
What's Your Reaction?