एफडीएची धडक कारवाई, 5 लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त
एफडीएची धडक कारवाई; 5 लाखांचा गुटखा-पानमसाला साठा व वाहन जप्त
मुख्य आरोपीसह कंपनीचे मालक, संचालकांसह सात जणांविरुद्ध गुन्हा; मोक्का लागू करण्याची प्रक्रिया सुरू
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (प्रतिनिधी) – सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कन्नड तालुक्यातील देवगाव येथे धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे इको सुझुकी वाहन जप्त केले. या कारवाईत 5 लाख 18 हजार 582 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपीसह कंपनीचे मालक व संचालक अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. त्यानंतर संपूर्ण मुद्देमालासह इको सुझुकी वाहन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी सचिन विलास वारे (रा. औराळा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासह प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे मालक व संचालक अशा इतर सहा जणांविरुद्ध प्रतिबंधित अन्नपदार्थांचे बेकायदेशीर उत्पादन, साठवणूक व विक्रीप्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 0149/2026 दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 3(5), 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा (एफएसएसए) कलम 59 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींच्या पात्रतेनुसार त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का), 1999 अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत अन्न सुरक्षा आयुक्तांच्या 12 जून 2026 रोजीच्या आदेशानुसार पडताळणी व पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दिकी तसेच देवगाव रंगारी पोलीस पथकाने संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली.
What's Your Reaction?