गावठी दारू माफीयावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, अकोला कारागृहात रवानगी...!

 0
गावठी दारू माफीयावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, अकोला कारागृहात रवानगी...!

गावठी दारू माफिया गणेश पवारवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; एका वर्षासाठी अकोला कारागृहात रवानगी...!

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांची गुन्हेगारीविरुद्ध कठोर मोहीम...

मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या...

छत्रपती संभाजीनगर, दि.10(डि-24 न्यूज)-

जिल्ह्यातील अवैध धंदे आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एम. पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे बनावट गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व चोरटी विक्री करणाऱ्या गणेश महादेव पवार (वय 34, रा. ढाकेफळ, जि. छत्रपती संभाजीनगर) या सराईत गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोपीची एका वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये दहशत आणि आरोग्याशी खेळ

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश पवार हा अत्यंत आडदांड आणि गुंड वृत्तीचा असून तो कायद्याला जुमानत नव्हता. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून, त्या दहशतीच्या जोरावर तो गावठी हातभट्टी दारूचा बेकायदेशीर धंदा चालवत होता. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, तो तयार करत असलेल्या गावठी दारूमध्ये कोणत्याही घटकाचे निश्चित प्रमाण नसल्याने, ती मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक व जीवघेणी ठरत होती. यामुळे ढाकेफळ (ता. पैठण) आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

वारंवार गुन्हे करूनही वर्तनात सुधारणा नाही

आरोपी गणेश पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (ई)(फ) अन्वये एकूण 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 93 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र, या कारवाईचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्याने आपल्या गुन्हेगारी आणि धोकादायक कारवाया चढत्या क्रमाने सुरूच ठेवल्या होत्या.

अशी झाली 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती आणि संघटित गुन्हेगारांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एम. पैठण पोलिसांनी आरोपीविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा ठोस प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. श्री. विनय गौडा जी सी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिनांक 9 जून 2026 रोजी आरोपी गणेश पवारविरुद्ध एम.पी.डी.ए. अधिनियम 1981 चे कलम 3 (1) अन्वये स्थानबद्धतेचा आदेश पारित केला. त्यानुसार 10 जून 2026 रोजी एम. पैठण पोलिसांनी या आदेशाची बजावणी करत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची अकोला जिल्हा कारागृहात रवानगी केली.

नमूद कारवाई पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, एम. पैठणचे तत्कालीन स.पो.नि. ईश्वर जगदाळे, स.पो.नि. भरत मोरे, पो.उप.नि. दशरथ बुरकूल, हरिविजय बोबडे, पोलीस अंमलदार दीपक सुरोशे (स्थागुशा), ज्ञानेश्वर भवर, अमित घोडके, विजय उगले, राहुल मोहतमल आणि रामेश्वर पंडित यांच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow