एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार, अध्यक्षपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करा - आमदार रोहित पवार
एमपीएससी विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार; अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करा
आमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा; दिल्लीगेट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 10 (डि-24 न्यूज) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारी शहरात आक्रोश मोर्चा काढला. आमखास मैदानापासून सुरू झालेला मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. त्यानंतर दिल्लीगेट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
MPSCच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंडे
यांची नियुक्ती करावी, वर्ग ‘क’ची परीक्षा नोव्हेंबरमध्येच घेण्यात यावी, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, तसेच मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार रोहित पवार म्हणाले, “MPSCच्या परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारने समिती नेमली, त्याचे स्वागत आहे. मात्र केवळ समिती किंवा एसआयटी नेमून प्रश्न सुटणार नाही. MPSCच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.”
‘वर्ग क’ची परीक्षा नोव्हेंबरमध्येच घ्या
वर्ग ‘क’ची परीक्षा जानेवारीमध्ये घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नसल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “शेतकरी कर्जाचा डोंगर डोक्यावर असतानाही आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत. पाऊस नसल्याने आणि पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलणे अन्यायकारक आहे. सण असले तरी विद्यार्थी परीक्षा देतील. परीक्षा नोव्हेंबरमध्येच घ्यावी.”
MPSCच्या परीक्षेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. केवळ काही जणांवर कारवाई करून किंवा एसआयटी स्थापन करून प्रश्न सुटणार नाही. पैशाच्या जोरावर पेपर खरेदी करून अपात्र व्यक्ती शासकीय सेवेत दाखल झाल्यास प्रशासनातील भ्रष्टाचार आणखी वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
“सरकारने MPSC अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा”
“अनेक प्रकरणांमध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली; मात्र वर्षानुवर्षे कारवाई झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारने MPSCच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणीही विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली.
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, “माझ्याकडे काम नाही म्हणून मी पेपरफुटीवर बोलतो, अशी टीका केली जाते. मात्र सरकारनेच काही परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचे मान्य केले आहे. वर्ग ‘क’ची परीक्षा पुढे ढकलावी लागली, हे सरकारचे अपयश आहे.”
“विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी आवाज उठवत राहणार”
सत्ताधारी आमदारांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिले असतानाही ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलण्यास तयार नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“मी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन केले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत आहे, म्हणून काहींच्या पोटात का दुखत आहे? विद्यार्थी असो, शेतकरी असो किंवा सामान्य नागरिक असो, त्यांच्या प्रश्नांवर मी आवाज उठवत राहणार. माझ्या मागे ईडी लावायची असेल तर लावा,” असे पवार म्हणाले.
नीटच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण दिल्लीला गेलो होतो आणि त्या आंदोलनाला यश मिळाले. त्याचप्रमाणे MPSCच्या विद्यार्थ्यांनीही जात-पात, पक्ष आणि संघटनांचे मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढा दिल्यास त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन पवार यांनी केले.
विद्यार्थ्यांनी मांडल्या व्यथा
यावेळी व्यासपीठावर उपस्थित विद्यार्थी नेत्यांनीही आपल्या मागण्या मांडल्या. काही विद्यार्थ्यांनी MPSCच्या कारभाराबाबतच्या आपल्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अखेर राष्ट्रगीताने आक्रोश मोर्चाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. अगोदर पुण्यात, छत्रपती संभाजीनगर येथे दोनदा, सोलापूर, सातारा येथे विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला. उद्या लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.
What's Your Reaction?