कन्नड येथे नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक, सरसकट पंचनामे करा - पालकमंत्री संजय शिरसाट

कन्नड येथे नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक
सरसकट पंचनामे करा-पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.25(डि-24 न्यूज)- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान मोठ्याप्रमाणावर झाले आहे. सर्वच क्षेत्रात शेतकऱ्यांना हा निसर्गाचा कोप सहन करावा लागत आहे. अशाप्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे असून सरसकट सर्वच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करा, त्यासाठी ड्रोन, मोबाईल फोटो यांचे पुरावे ग्राह्य धरा,असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज कन्नड येथे दिले.
कन्नड येथील तहसिलदार कचेरीत आज पालकमंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीचा व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
आ. संजना जाधव, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट तसेच अन्य विभागांचे अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ, शेतकरी आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानुसार, तालुक्यात सरासरीच्या 123 टक्के पर्जन्यमान झाले आहे. 8 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 101 गावांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. 19 हजार 264 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. 20 जनावरे व 4 माणसे दगावली आहेत.कापूस, मका, भाजीपाला आदीपिकांचे नुकसान झाले आहे. अद्याप अनेक ठिकाणी पाणी साचले असल्यामुळे पंचनामे होऊ शकले नाहीत. पंचनामे झाल्यावर नुकसानीचा प्रत्यक्ष अंदाज येईल.
उपस्थित शेतकऱ्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी बैठकीत आपले गाऱ्हाणे यावेळी पालकमंत्री शिरसाट यांच्यासमोर मांडले. त्यात प्राधान्याने वन्य प्राण्यांचा उपद्रव, शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते नसणे, शेताची जमीनच वाहून जाणे, शेतात पाणी तुंबणे इ.समस्यांचा समावेश होता.
आ. संजना जाधव म्हणाल्या की, तालुक्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन उभे आहे.पंचनामे सगळ्यांचे होतील आणि योग्य ती नुकसान भरपाई मिळेल. शासनाने दिवाळीपुर्वी ही भरपाई द्यावी, अशी मागणीही श्रीमती जाधव यांनी केली.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, अत्यंत संवेदनशीलपण प्रशासन काम करीत आहे. दररोज मंडळ, तलाठी स्तरावर आढावा घेण्यात येत आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया होत आहे. त्यात स्थानिक अडचणी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्रणेला सहकार्य करावे. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पार पाडून शासनाकडून अनुदान प्राप्त होताच मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनीही होत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
पालकमंत्री शिरसाट यांनी निर्देश दिले की, जिल्हाधिकारी यांनी आपल्यास्तरावरुन मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचा दररोज सायं. 6 वा. आढावा घ्यावा. शासनाने निर्देश दिल्यानुसार ड्रोन सर्व्हे करा, मोबाईल फोटो व्हिडीओचे पुरावे ग्राह्य धरुन पंचनामे करा. वन विभागानेवन्य प्राण्यांचाशेतीतील शिरकाव थांबविण्यासाठी उपाययोजना राबवाव्या. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबाबतची प्रक्रिया राबवा. नुकसानीचा अंदाज पाहता सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करा, आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी या संकटसमयी शासन उभे आहे,असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
याप्रसंगी पुरात मयत झालेल्या संजय दळे या व्यक्तीच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचा चार लक्ष रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
पालकमंत्र्यांनी केली तालुक्यातील नुकसानीची पाहणी...
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी तालुक्यातील करंजखेड, नेवपुर, घाटशेंद्रा, टाकळी अंतूरआदी ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्या समवेत आ. संजना जाधव, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






