क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली अवजड ट्रक अडकला, चालकाची तारांबळ, वाहतूक कोंडी...
क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली अवजड ट्रक अडकला; चालकाची उडाली तारांबळ
पुलाच्या भिंतीला तडे; गोंधळामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांनी दिला मदतीचा हात
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली अवजड मालवाहू ट्रक शिरल्याने मंगळवारी सकाळी मोठी धांदल उडाली. पुलाच्या उंचीचा अंदाज न आल्याने ट्रक पुलाच्या भिंतीला धडकून अडकला. या घटनेत पुलाच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसून आले असून, काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास MH-43 CE-7682 क्रमांकाचा मालवाहू ट्रक क्रांतीचौक उड्डाणपुलाजवळून वळण घेत असताना हा प्रकार घडला. चालकाला पुलाच्या उंचीचा अंदाज न आल्याने लांबलचक ट्रक पुलाच्या भिंतीवर आदळून मधोमध अडकला.
ट्रक अडकल्यानंतर चालक काहीसा गोंधळून गेला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला वाहन बाहेर काढण्यासाठी दिशानिर्देश दिले. मात्र, नागरिकांची गर्दी आणि आरडाओरड यामुळे चालक आणखी गोंधळला. ट्रक वळवित असताना त्याचे टायरही फुटल्याची माहिती आहे.
दरम्यान, क्रांतीचौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच समोरच दोन मंडळांचे मोठे गणपती मंडप असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. नागरिकांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी घटनास्थळी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले.
अथक प्रयत्नानंतर ट्रक वळविण्यात यश आले. अखेर हा ट्रक आकाशवाणी मार्गाच्या दिशेने रवाना झाल्यानंतर अडकलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेमुळे उड्डाणपुलाखाली अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
What's Your Reaction?