गणेशोत्सवात महापालिकेचा "आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा"च्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर...
गणेशोत्सवात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा ‘आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा’च्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर...
50 हून अधिक गणेश मंडळांमध्ये पथनाट्य व म्युझिकल बँडद्वारे जनजागृती; स्वच्छता रथातूनही शहरभर स्वच्छतेचा संदेश...
पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात 350 हून अधिक गणेश मंडळांचा सहभाग...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा’ (2026 – वर्ष दुसरे) हा विशेष जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये शहरातील विविध गणेश मंडळे, शाळा, महाविद्यालये, प्रमुख चौक, नागरी वस्त्या तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी विविध माध्यमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
महापौर श्री. समीर राजूरकर व आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या संकलनेतून , उपायुक्त श्री. नंदकिशोर भोंबे यांच्या नियोजनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.
पथनाट्याबरोबर म्युझिकल बँडची अनोखी जनजागृती...
‘आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा’ या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पथनाट्यासोबत म्युझिकल बँडच्या माध्यमातून करण्यात येणारी अभिनव जनजागृती. शहरातील विविध गणेश मंडळांसमोर म्युझिकल बँडच्या माध्यमातून सुप्रसिद्ध हिंदी व मराठी गाण्यांच्या लोकप्रिय चालींचा वापर करून स्वच्छता, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, कचरा वर्गीकरण, ओला-सुका कचरा तसेच प्लास्टिकमुक्ती याबाबत स्पुफ सादर करण्यात येत आहेत.
लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर तयार करण्यात आलेले हे संदेशात्मक स्पुफ नागरिकांना सहज लक्षात राहतील अशा पद्धतीने सादर केले जात असून, त्यामध्ये मनोरंजनासोबतच स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. ऑक्टोपॅडसारख्या तालवाद्यांसह विविध वाद्यांचा वापर करून सादर होणाऱ्या या म्युझिकल बँडला विशेषतः तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पारंपरिक जनजागृतीसोबतच संगीत, ताल, विनोद आणि लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्याचा हा अभिनव प्रयत्न ठरत आहे. गणेश मंडळांमध्ये उपस्थित असलेल्या तरुण-तरुणी, गणेश भक्त आणि नागरिक मोठ्या उत्साहाने या सादरीकरणाचा आनंद घेत असून, त्याचवेळी कचरा कुठे आणि कसा द्यायचा, ओला-सुका कचरा वेगळा का करायचा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव का साजरा करायचा, याचा संदेशही त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे.
50 हून अधिक गणेश मंडळांमध्ये जनजागृती...
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांतील गणेश मंडळांसमोर नियमितपणे पथनाट्य, म्युझिकल बँड आणि संदेशात्मक स्पुफ सादर करण्यात येत आहेत. आतापर्यंत शहरातील 50 पेक्षा अधिक गणेश मंडळांमध्ये जनजागृती कार्यक्रम पार पडले आहेत.
या कार्यक्रमांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचरा रस्त्यावर न टाकणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करणे तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
स्वच्छता रथातून दिवसभर शहरभर जनजागृती...
या उपक्रमांतर्गत केवळ गणेश मंडळांपुरती जनजागृती मर्यादित न ठेवता दिवसभर स्वच्छता रथाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
महानगरपालिकेचा स्वच्छता रथ प्रमुख शाळा, महाविद्यालये, नागरी वस्त्या, महत्त्वाचे चौक, बाजारपेठा तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी फिरविण्यात येत आहे. स्वच्छता रथाच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकाद्वारे स्वच्छतेचे संदेश देण्यात येत असून, नागरिकांना कचरा वर्गीकरण, योग्य पद्धतीने कचरा देणे, निर्माल्य स्वतंत्रपणे देणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगत ‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी’ हा संदेश देण्यात येत आहे. नागरी वस्त्यांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधून कचरा वर्गीकरण व कचरा संकलनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
350 हून अधिक गणेश मंडळांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सहभाग...
महानगरपालिकेच्या वतीने यंदा ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या उपक्रमालाही विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये आतापर्यंत 350 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला आहे. यातील सर्व सहभागी गणेश मंडळांना सहभागाचे सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले आहे. तसेच अंतिम फेरीच्या परीक्षणासाठी मनपा अधिकारी, पत्रकार,तज्ञ मंडळी यांसह यांची टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम गणेश मंडळात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन करणार आहे.
पर्यावरणपूरक सजावट, मातीच्या गणेशमूर्ती, नैसर्गिक व पारंपरिक साहित्याचा वापर, प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे, स्वच्छता तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे विविध उपक्रम यांचा अवलंब करणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत सहभागी गणेश मंडळांचे महानगरपालिकेच्या वतीने परीक्षण करण्यात येणार असून, उत्कृष्ट पर्यावरणपूरक देखावे व पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांची निवड करून त्यांना बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव व्हावा, या उद्देशाने महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पारंपरिक जनजागृतीसोबतच संगीत, पथनाट्य, स्वच्छता रथ आणि विविध नाविन्यपूर्ण माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून कचरा वर्गीकरण, निर्माल्य संकलन, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्य करावे आणि ‘स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक छत्रपती संभाजीनगर’ घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?