गांजाची विक्री करणारा आरोपी जेरबंद, 1.757 किलो गांजा जप्त...!
गांजाची विक्री करणारा आरोपी जेरबंद; 1.757 किलो गांजा जप्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग, गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका आरोपीकडून 1 किलो 757 ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 87 हजार 850 रुपये असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे व पोलीस उपनिरीक्षक उज्ज्वल मुंडे यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रामराई शिवार, जोगेश्वरी ते वाळूज रोड परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी सुभाष शहाजी पवार (वय 31) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेला 1 किलो 757 ग्रॅम गांजा आढळून आला.
चौकशीत हा गांजा नितीन भगवान काळे (रा. रामराई शिवार) याच्याकडून आणल्याची माहिती आरोपीने दिली. त्यानुसार वाळूज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोउनि उत्रेश्वर मुंडे, पोह भाऊसिंग चव्हाण, नारायण पायघन, पोअं सतिश जाधव, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे, मपोअं छाया लांडगे, चालक पोअं विठ्ठल पवार तसेच अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
शहरामध्ये कोठेही अंमली पदार्थ विक्री करताना किंवा नशा करताना कोणी इसम किंवा नशाखोरी करणा-या टोळ्या आढळून आल्यास तसेच नशेकरीता कोणी जागा उपलब्ध करून देत असल्यास त्याबाबतची माहिती मोक्र. 9684702002 यावर व्हाॅटसअप द्वारे मॅसेज करुन नागरिक देवू शकतात.
What's Your Reaction?