ग्रामीण पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करत 9 क्विंटल गांजा केला नष्ट...!
ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 906.63 किलो जप्त गांजा कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल 906.63 किलो गांजा सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट केला आहे. अंमली पदार्थांच्या जप्त मुद्देमालाची पारदर्शक आणि नियमानुसार विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
सन 2023 ते 2026 या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून गांज्याची झाडे आणि सुका गांजा असा एकूण 906.63 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हा मुद्देमाल पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील मध्यवर्ती गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने या मुद्देमालाचा आढावा घेतला. गांजा नष्ट करण्यापूर्वी रासायनिक विश्लेषण (सीए) अहवाल, न्यायालयाची परवानगी तसेच इतर सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडली.
यानंतर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सहाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत तसेच प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई पार पडली.
8 जुलै 2026 रोजी हा संपूर्ण गांजा सुरक्षितपणे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील Maharashtra Enviro Power Limited येथे पाठविण्यात आला. पर्यावरणीय व कायदेशीर निकषांचे पालन करून तेथे त्याचा अंतिम नाश करण्यात आला.
या कारवाईमध्ये वैजापूर, करमाड, पिशोर, शिवूर, फुलंब्री, सिल्लोड ग्रामीण आणि बिडकीन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एनडीपीएस कायद्यातील गुन्ह्यांमधील जप्त अंमली पदार्थांचा समावेश होता.
अंमली पदार्थांच्या अवैध साखळीवर प्रभावी आळा घालणे, जप्त मुद्देमालाची पारदर्शक विल्हेवाट लावणे आणि समाजाला व्यसनमुक्त व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सहाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत तसेच पोलीस अंमलदार संगीता वासडीकर, रवी लोखंडे, सचिन सोनार, प्रिया भंडारे आणि सरला जाधव यांनी यशस्वीपणे पा
र पाडली.
What's Your Reaction?