जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी शुल्क तातडीने भरा अन्यथा अर्ज रद्द होणार, 7 ऑगस्ट पर्यंत मुदत...!
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी शुल्क तातडीने भरा अन्यथा अर्ज होणार रद्द...
सात ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने जन्म व मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली असून, या सेवेसाठी अर्ज करूनही शुल्क न भरलेल्या नागरिकांना दि.7 ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन शुल्क भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा आयुक्त यांच्या आदेशानुसार संबंधित अर्ज रद्द करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या ई-गव्हर्नन्स (RTS Portal – Right to Service) प्रणालीद्वारे जन्म व मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. या सेवेसाठी निर्धारित कालमर्यादा सात दिवसांची आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर अर्जदारांना SMS व ई-मेलद्वारे ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी पेमेंट लिंक पाठविण्यात येते. शुल्क भरल्यानंतरच संबंधित प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाते.
मात्र, अनेक अर्जदारांना पेमेंट लिंक पाठवून 60 दिवसांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही त्यांनी शुल्क भरलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत निश्चित कालमर्यादेत सेवा देणे शक्य होत नसून RTS Portal वर मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित राहात आहेत.
यामुळे महानगरपालिकेने अशा सर्व अर्जदारांना हे आवाहन केले आहे की, दि.7 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन शुल्क भरावे.* निर्धारित मुदतीत शुल्क न भरल्यास संबंधित अर्ज कोणतीही पुढील सूचना न देता रद्द करण्यात येतील.
अर्ज रद्द झाल्यास संबंधित नागरिकांना पुन्हा RTS Portal वर जाऊन जन्म अथवा मृत्यू नोंदणीसाठी नवीन अर्ज दाखल करावा लागेल. त्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करून नव्याने प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून त्यानंतरच ऑनलाइन प्रमाणपत्र मिळू शकेल.
दरम्यान, भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत यासाठी महानगरपालिकेने नवीन कार्यपद्धती (SOP) निश्चित केली आहे. त्यानुसार, नागरिकांनी RTS Portal वर अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित उपनिबंधक तथा सहाय्यक आयुक्त अर्जाची पडताळणी करून शुल्क भरण्यासाठी पेमेंट लिंक पाठविणार आहेत.
पेमेंट लिंक पाठविल्यानंतर अर्जदाराने शुल्क भरणा केल्यानंतर भरणा केल्याच्या दिनांक पासून सात दिवसाच्या अवधीत प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाईल.
अर्जदारास पेमेंट लिंक
पाठवल्यावर अर्जदाराने निर्धारित कालावधीत शुल्काचा भरणा केल्या नसल्यास अशा अर्जदाराचा अर्ज तात्पुरता निकाली काढण्यात येईल अशा अर्जदारास सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज करणे आवश्यक असेल.करिता संबंधित अर्जदारांनी सदर ऑनलाईन सेवेचा लाभ नियतकाल मर्यादित घेण्यासाठी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
What's Your Reaction?