जमीनीच्या फेर मंजुरीसाठी 10 हजारांची लाच स्वीकारताना दोघे एसिबीच्या जाळ्यात...!

 0
जमीनीच्या फेर मंजुरीसाठी 10 हजारांची लाच स्वीकारताना दोघे एसिबीच्या जाळ्यात...!

फेर मंजुरीसाठी 10 हजारांची लाच स्वीकारताना दोघे एसीबीच्या जाळ्यात...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)-सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथील जमिनीचा फेर मंजूर करून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याचा खासगी मदतनीस व त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणातील तक्रारदाराने मौजे चिंचपूर येथील गट क्रमांक 123 मधील दोन गुंठे जमीन खरेदी केली होती. या जमिनीचा फेर मंजूर करण्यासाठी त्यांनी तलाठी सजा कार्यालय, पालोद येथे अर्ज दाखल केला होता. फेर प्रलंबित असल्याने तक्रारदाराने मंडळ अधिकाऱ्याच्या खासगी मदतनीस अमोल श्रीरंग बडक याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी फेर मंजूर करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना 20 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली.

याबाबत तक्रारदाराने 6 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली. 7 जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता अमोल बडक याने 20 हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करून 10 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम साथीदार सचिन काशिनाथ बडक यांच्या फोनपे खात्यावर स्वीकारण्याचे ठरविण्यात आले.

यानुसार सिल्लोड येथील कोहिनूर कापड दुकानासमोर एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून 10 हजार रुपये फोनपेद्वारे स्वीकारताच पथकाने अमोल बडक व सचिन बडक या दोघांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान दोघांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर करीत आहेत. पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास टोल फ्री क्रमांक 1064 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 7720891064 वर तात्काळ संपर्क साधावा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow