जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोंगावले लाल वादळ...!
 
                                जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोंगावले लाल वादळ...!
आपल्या मागणीसाठी राज्यातील लाखो अंगणवाडी कर्मचारी संपावर... जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल वादळ घोंगावले. हातात आयटकचा लाल झेंडा घेत हजारो अंगणवाडी कर्मचारी मोर्चात सहभागी झाल्या. आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सध्या सुरू आहे.
आयटक या राज्यव्यापी संघटनेसह राज्यातील सुमारे सव्वादोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या कृती समितीच्या वतीने 4 डिसेंबर 2023 पासून राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतनश्रेणी मिळावी तसेच हा दर्जा मिळेपर्यंत किमान 26 हजार वेतन दरमहा, पेन्शन, ग्रॅच्युइटी या प्रमुख मागण्यासह विविध प्रलंबित मागणीसाठी हा बेमुदत संप आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी देखील आप आपल्या अंगणवाड्या बंद ठेवून या संपात सहभागी झाल्या असून ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महीला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अंगणवाडी सेविकेस शिक्षिकेचा म्हणजेच तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा तर अंगणवाडी मदतनीसास चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी द्या. हि वेतनश्रेणी मिळेपर्यंत मानधनाऐवजी 26000 रुपये किमान वेतन दरमहा द्या, निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या निम्मे वेतन दरमहाचे पेन्शन म्हणून मिळण्याचा कायदा करा. मदतनिसांना सेविकांच्या जागावर थेट बढती द्या. सेविकांच्या मदतनिसांच्या व मुख्य सेविकांच्या रिक्त जागा तातडीने भरा. अंगनवाडीचे महत्वाचे काम करण्यासाठी चांगल्या प्रतीचे मोबाईल मराठी अॅपसह द्या. पोषण आहार कामाची सक्ती करु नका. मिनी अंगणवाड्याचे रुपांतर पूर्ण अंगणवाड्यात करावे. इतर प्रलंबित थकीत प्रवास भत्ता देयके त्वरित द्यावे. दरमहा पाच तारखेच्या आत वेतन अदा करावे. एका महिन्याएवढा बोनस द्यावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हा तथा राज्य उपाध्यक्ष काॅ.प्रा.राम बाहेती, जिल्हा सचिव काॅ.तारा बनसोडे, राज्य सचिव काॅ.शालिनी पगारे, संघटक काॅ. अनिल जावळे, काॅ. ज्योती गायकवाड, काॅ. विमल वाडेकर, काॅ. विलास शेंगुळे, काॅ.मिरा अडसरे, काॅ. शन्नो खान, काॅ. संगीता अंभोरे, काॅ. सुनीता शेजवळ, काॅ. गंगा जंजाळ, काॅ. गीता पांडे, काॅ. माया भिवसने, काॅ. शिला साठे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            