जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास ठेवू नका - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

 0
जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास ठेवू नका - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत;

शांतता व संयम राखा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21 (डि-24 न्यूज)- गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी (Panic Buying) केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. सोशल मीडियावरील काही चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी शांतता व संयम राखावा,असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

यासंदर्भात आज जिल्हा पुरवठा शाखेने दिलेली माहिती याप्रमाणे-

जिल्ह्यात 30% अतिरिक्त इंधन पुरवठा सुरू...

जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील तेल कंपन्यांच्या डेपोमधून सर्व पेट्रोल पंपांवर नियमित मागणीपेक्षा 30 टक्क्यांनहून अधिक अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरक्षित आहे.

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका...

सोशल मीडिया (व्हॉट्सॲप, फेसबुक इ.) वर इंधन टंचाई किंवा वाहतूक बंद असल्याबाबतचे जे मेसेज फिरत आहेत, ते अपूर्ण माहितीवर आधारित, तसेच चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, तसेच असे संदेश फॉरवर्ड करू नयेत.

विनाकारण साठा करू नका, पंपांवर गर्दी टाळा...

नागरिकांनी भीतीपोटी गाड्यांच्या टाक्या फुल करणे किंवा कॅन/डब्यांमध्ये इंधनाचा साठा करणे पूर्णपणे थांबवावे. एकाच वेळी सर्वांनी पंपांवर गर्दी केल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या गर्दीमुळे रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ शकतो, याचे भान सर्वांनी ठेवावे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन...

"जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आणि मुबलक आहे. नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता संयम ठेवावा आणि शांतता राखावी. केवळ गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे, विनाकारण साठा करू नये. सोशल मीडियावरून चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासन सायबर कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करेल.",असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow