तिसगाव खवळ्या डोंगरावर मुलाची आत्महत्या रोखण्यासाठी गेलेल्या आई वडीलांचाही दुर्दैवी मृत्यू, जिल्ह्यात हळहळ...
खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचाही मृत्यू...
मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा मृत्यू; धक्क्याने आईचाही दुर्दैवी अंत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 21 (डि-24 न्यूज) : तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी (दि. 21) एकाच कुटुंबावर काळाचा घाला घालणारी हृदयद्रावक घटना घडली. 18 वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेचा मोठा धक्का बसलेल्या आईचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे सातारा-देवळाई परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
देवळाई-सातारा परिसरातील रहिवासी कुणाल मुरलीधर चांदवडे हा तरुण शुक्रवारी सकाळी खवड्या डोंगरावर गेल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. तो अडचणीत असल्याचे समजताच त्याचे वडील मुरलीधर चांदवडे, आई संगीता चांदवडे तसेच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
कुणालला समजावून सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न सुरू होते. तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनीही जवळपास तीन तास कुणालशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, कुणालला सुरक्षित ठिकाणी आणण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर त्याच्याजवळ गेले. यावेळी दोघांचा तोल गेल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.
आईलाही मोठा धक्का
पती आणि मुलासोबत घडलेली दुर्घटना पाहिल्यानंतर संगीता चांदवडे यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. उपस्थित नागरिकांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
कुणाल या परिस्थितीत का सापडला, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी आणि घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती घेतली जात आहे.
परिसरात शोककळा...
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केलेल्या मदतीच्या प्रयत्नांनंतरही घडलेली ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक ठरली. अवघ्या काही वेळात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सातारा-देवळाई परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?