दहशतवादाच्या आरोपाखाली अटक झालेल्या तरुणाची तुरुंगातून सुटका, एड एस.एम.नजीब यांनी यशस्वीपणे बाजू मांडली...!
दहशतवादाच्या आरोपाखाली अटक झालेल्या तरुणाची तुरुंगातून सुटका; ॲडव्होकेट एस. एम. नजीब यांनी यशस्वीपणे बाजू मांडली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- गेल्या वर्षी धर्मवरम टाऊन पोलीस ठाण्याने क्राइम क्रमांक 170/2025 अंतर्गत तरुण धर्मगुरू मौलाना सज्जाद हुसेन यांना कथित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील मदरसा जामिया अरबिया इस्लामिया येथून दिनांक 13/09/2025 रोजी अटक केली होती.
या प्रकरणी आरोपीच्या कुटुंबीयांनी ॲडव्होकेट एस. एम. नजीब यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर मदतीची मागणी केली. ॲडव्होकेट एस. एम. नजीब यांनी प्रकरणाचा सखोल अभ्यास केल्यानंतर दिनांक 18 मे 2026 रोजी अनंतपूर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी जामिनास विरोध करताना हे प्रकरण दहशतवादाशी संबंधित असल्याचे सांगितले. तसेच आरोपी क्रमांक एकाने आपल्या कबुलीजबाबात संबंधित आरोपीचे नाव घेतले असून हा देशाविरुद्ध कट रचण्याचा गंभीर प्रकार असल्याचा युक्तिवाद केला.
यास उत्तर देताना ॲडव्होकेट एस. एम. नजीब यांनी न्यायालयात युक्तिवाद करत सांगितले की, संबंधित आरोपी निरपराध असून त्याचा अशा प्रकारच्या कोणत्याही कारवायांशी संबंध नाही. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींसोबत त्याचा कोणताही संपर्क किंवा संबंध नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
दिनांक 25 मे 2026 रोजी न्यायालयाने तरुण धर्मगुरूंना जामीन मंजूर करत त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.
जामीन मंजूर झाल्यानंतर ॲडव्होकेट एस. एम. नजीब यांनी याला न्यायव्यवस्था आणि न्यायाचा विजय असल्याचे म्हटले. त्यांनी या यशाचे श्रेय कठोर परिश्रम, संघर्ष आणि नातेवाईकांच्या प्रार्थनांना दिले.
या यशाबद्दल वरिष्ठ ॲडव्होकेट पठाण तेहवर खान तसेच नातेवाईकांनी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, ॲडव्होकेट एस. एम. नजीब हे औरंगाबाद शहरातील युवा, सक्रिय आणि उदयोन्मुख वकील म्हणून ओळखले जातात.
What's Your Reaction?