दिल्ली गेट, ऐतिहासिक सलिम अली सरोवराचा विकास करण्यासाठी जावेद कुरेशी यांचा पुढाकार, महापौर, आयुक्तांची भेट

 0
दिल्ली गेट, ऐतिहासिक सलिम अली सरोवराचा विकास करण्यासाठी जावेद कुरेशी यांचा पुढाकार, महापौर, आयुक्तांची भेट

दिल्ली गेट, सलीम अली सरोवराच्या विकासासाठी जावेद कुरेशी यांचा पुढाकार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 18 (डि-24 न्यूज) : दिल्ली गेट परिसरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवराचा पर्यावरणपूरक पद्धतीने विकास करून या परिसराचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी जावेद कुरेशी यांनी पुढाकार घेतला आहे. सरोवरात पुन्हा देश-विदेशातील पक्ष्यांचे आगमन व्हावे, तसेच नागरिक व पर्यटकांसाठी निसर्गरम्य परिसर निर्माण व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विकासकामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यासंदर्भात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सलीम अली सरोवर परिसराची पाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीच्या चारही नगरसेवकांनी सलीम अली सरोवराच्या विकासाचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला होता. त्यानुसार आज आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांसह सरोवराची पाहणी करण्यात आली. काही पर्यावरणवादी संस्था व पक्षी संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे परिसरातील विकासकामांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे न्यायालयात शपथपत्र दाखल करून न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणाचे संरक्षण करत या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गणपती उत्सवानंतर टप्प्याटप्प्याने विकासकामांना सुरुवात करण्याचे नियोजन असून, सुरुवातीला सरोवरात येणारे दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचे पाणी बंद करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानंतर परिसराचे सुशोभीकरण, नागरिकांसाठी वॉकिंगची सुविधा तसेच पक्ष्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

जावेद कुरेशी म्हणाले, सलीम अली सरोवर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. पूर्वी देश-विदेशातील पक्षी येथे येत असत आणि पक्षीप्रेमी व अभ्यासक या परिसराला भेट देत होते. मात्र, सरोवरातील पाणी दूषित झाल्यामुळे पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. सरोवराचे संवर्धन करून पूर्वीचे निसर्गरम्य वातावरण पुन्हा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

नागरिक व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी परिसरात वॉकिंग प्लाझा उभारणे, सुशोभीकरण करणे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करून आवश्यक विकासकामे करणे गरजेचे आहे. न्यायालयीन प्रकरण असल्याने न्यायालयाच्या आदेशांचे पालन करूनच या परिसराचा कायापालट करण्यात यावा, यासाठी आज महापौर, मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांनी पाहणी केली असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.

यावेळी महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, नगरसेवक अफसर खान, अमित भुईगळ, जावेद कुरेशी, करुणा जाधव, मेघानंद जाधव, मुजाहीद कुरेशी, ॲड. जुनेद जावेद कुरेशी, संजय कांबळे, मतीन पटेल, जाकेर शेख, मोहम्मद अश्फाक, कय्यूम खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow