दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात केले आंदोलन...
दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाविरोधात केले आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित अनियमित कामकाज आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणींच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अबुल आला हाश्मी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून कार्यालयातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये इम्पाउंडिंग दस्तऐवजांमध्ये जास्त शुल्क आकारले जाणे, अॅडज्युडिकेशनच्या फाईलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची चौकशी करणे, नोंदणीसाठी सादर केलेले दस्तऐवज दुय्यम निबंधकांकडून वेळेत तपासले जात नसणे, तसेच ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रणालीद्वारेही कामकाजात अडथळे येत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. गरीबांच्या घरांची व प्लाॅटची चारशेहून जास्त रजिस्ट्रीची प्रकरणे निकाली काढण्यात आली नाही.
तसेच, ज्या स्लॉट्स आधी उपलब्ध आहेत त्यांचे दस्तऐवज आधी तपासून नोंदणी करण्याची मागणी, नागरिकांशी दस्तऐवज लेखन करताना अशोभनीय भाषेचा वापर टाळणे, दुय्यम निबंधक कामाच्या वेळेत नोंदणी होत असताना खुर्चीवर उपस्थित राहणे आणि विनाकारण कबुली जबाब नोंदविणे आदी मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांनी नोंदणी उपमहानिरीक्षक कैलास दवंगे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दस्त नोंदणीमध्ये भ्रष्टाचारासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी थांबवावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आंदोलनानंतर मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी रफत यारखान, अबुल हसन हाश्मी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?