नवतेजस्विनी योजना जिल्हा सल्लागार समितीची बैठक, महीलांच्या स्वयंरोजगाराला चालना द्या - जिल्हाधिकारी

नवतेजस्विनी योजना जिल्हा सल्लागार समिती बैठक
महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)- महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या शेळी पालन. जीवामृत, दुग्धव्यवसाय, पनीर तयार करणे, मदर पोल्ट्री अशा व्यवसायांना येत्या मार्च अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षात पूर्ण कार्यान्वित करा. महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हासमन्वयक चंदनसिंग राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्रीमती सुवर्णा जाधव, महिला बालविकास अधिकारी श्रीमती रेश्मा चिमंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिल्ह्यात डिसेंबर 2024 अखेर 187 गावांमध्ये 3969 महिला बचत गट असून त्याद्वारे 40 हजार 803 महिला जोडल्या गेल्या आहेत. या नवतेजस्विनी महिलांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी चालना देण्यात येत असून त्यात शेळीपालन, जीवामृत तयार करणे, दुग्ध व्यवसाय व पनीर उद्योग, मदर पोल्ट्री युनिट अशा विविध व्यवसायांचा समावेश आहे. त्यांतर्ग जिल्ह्यात सहा सुधारीत शेळीपालन व शेळी खरेदी विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत.
त्यात वडोदबाजार ता.फुलंब्री, रघुनाथ नगर ता. गंगापूर, शेरेगाव-लासूर स्टेशन, बिडकीन ता.पैठण, ब्रह्मगव्हाण, आन्वी ता. सिल्लोड यांचा समावेश असून त्यात 16 गावांमधील 600 महिलांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी 90 लक्ष रुपये निधी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीकडून 1 कोटी 5 लक्ष 72 हजार रुपये लाभार्थी हिस्सा, 2 कोटी 70 लक्ष रुपये बॅंकेकडून कर्जस्वरुपात, अभिसरणातून 5 लख 70 हजार रुपये, केंद्रीय नियंत्रण कक्षाकडून 25 लाख 20 हजार रुपये असे एकूण 4 कोटी 96 लक्ष 62 हजार रुपये निधी प्राप्त झाला असून शेळ्यांसाठी निवारा संमतीपत्र, विक्री युनिट करीता जागा असे विविध टप्पे पार पडले आहेत.
त्याच प्रमाणे बुट्टेवडगाव व डोनगाव या क्षेत्रातील चार गावांमध्ये 200 महिला जीवामृत व द्रव युनिट बनवित आहेत. त्यासाठी 19 लक्ष 90 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच आगामी वर्षासाठी जिल्ह्यातील 678 गटांसाठी 27 कोटी 65 लक्ष 98 हजार रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. तसेच 170 गावांमध्ये 1267 महिला बचत गट सदस्य महिलांना 1 कोटी 90 लाख 5 हजार रुपये इतके अर्थसहाय्य विविध व्यवसायासाठी वितरीत करण्यात आले आहे,अशी माहिती देण्यात आली,
What's Your Reaction?






