सर्व जिल्ह्यांनी ध्वजदिन निधी इष्टांक पूर्ण करावा - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

 0
सर्व जिल्ह्यांनी ध्वजदिन निधी इष्टांक पूर्ण करावा - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

विभागातील सर्व जिल्ह्यांनी ध्वजदिन निधी संकलन

इष्टांक पूर्ण करावा- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

नव्या वर्षापासून जिल्हा प्रशासनाचा प्रत्येक महिन्यात

‘एक दिवस सैनिकांसाठी’- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर(डि-24 न्यूज),दि.10(डि-24 न्यूज)- देशाच्या सिमांचे रक्षण करण्याचे कर्तव्य बजावतांना प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती संपूर्ण देश नतमस्तक व कृतज्ञ आहे. अशा सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधीत योगदान देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांनी आपापल्या जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनासाठी दिला जाणारा इष्टांक पूर्ण करावा,असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.

 जिल्हा प्रशासन येत्या सन 2025 पासून दर महिन्यातील एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून या दिवशी सैनिकांचे, माजी सैनिकांचे,त्यांच्या अवलंबितांची कामे विशेषत्वाने मार्गी लावण्यात येतील,असा संकल्प जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ध्वजदिन निधी संकलन प्रारंभा प्रसंगी व्यक्त केला.

 जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. मौलाना आझाद संशोधन केंद्र येथील सभागृहात आज हा समारंभ पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर(निवृत्त) सय्यदा फिरासत, मेजर सुभाष साळवे, विंग कमांडर जाधव, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क क्षीरसागर तसेच माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, वीरमाता, वीर पत्नी, वीर पिता आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व वीरमाता, वीर पत्नी, वीर पिता यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात कामगिरी बजावणारे माजी सैनिक, त्यांचे पाल्य यांनाही गौरविण्यात आले.

 आपल्या संबोधनात पोलीस अधीक्षक राठोड म्हणाले की, कोणत्याही देशाच्या प्रगतीमागे देशाच्या सीमा सुरक्षित असणे हे सगळ्यात महत्त्वाचे कारण असते. त्यासाठी योगदान देणारे सैनिक हे आपल्या देशाच्या प्रगतीला कारणीभूत असतात. त्यासाठी ते प्रसंगी प्राणाचे बलिदान देतात. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञ असणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, जिल्ह्याला ध्वजदिन निधी संकलनासाठी 1 कोटी 20 लक्ष रुपये इतके उद्दिष्ट असले तरी जिल्हा 1 कोटी 50 लक्ष इतके निधी संकलन करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळवेल. या निधी संकलनात सगळ्यांनी आपला वाटा उचलावा. याशिवाय जिल्हा प्रशासन प्रशासकीय कामकाजात दर महिन्याला एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम राबवुन सैनिकांचे त्यांच्या कुटुंबियांचे प्रशासनाच्यास्तरावरची कामे पूर्ण करेल.

 विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले की, विभागातील सर्व जिल्ह्यांनी आपापल्या जिल्ह्यात दिलेले ध्वजदिन निधी संकलनाचे इष्टांक प्राधान्याने पूर्ण करुन संपूर्ण विभाग ध्वजदिन निधी संकलनात अव्वल ठेवावा,असे निर्देश त्यांनी दिले. तसेच ध्वजदिन निधीत सढळ हाताने आपले योगदान देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ते प्रत्येक नागरिकाने द्यावे,असे आवाहनही त्यांनी केले.

 प्रास्ताविक मेजर(निवृत्त) सय्यदा फिरासत यांनी केले. सूत्रसंचालन गौतमी आव्हाड यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow