दर्जेदार सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नव वर्षासाठी प्रशासनाचा संकल्प - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
दर्जेदार सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नव वर्षासाठी प्रशासनाचा संकल्प - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

दर्जेदार सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा...

कालबद्ध कार्यक्रम;नव वर्षासाठी प्रशासनाचा संकल्प...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.10(डि-24 न्यूज)- गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी दशसुत्री कार्यक्रम व मनरेगातून जिल्हा परिषद शाळांचे सौंदर्यीकरण जिल्ह्यात ‘मिशन मोड’ वर राबवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. दर्जेदार शैक्षणिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यात राबवावयाचा संकल्प नव्या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाने केला आहे.  

 जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांची आज दुरदृष्य प्रणालीने बैठक घेण्यात आली. जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण उपस्थित होते. 

 शासन निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शाळांमध्ये सुविधा निर्मिती व सौंदर्यीकरण करण्यासाठी निधी उपलब्धता असते. याआधारे जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधांचा विकास करावयाचा आहे. त्याकरीता कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा. जिल्ह्यात 2106 जिल्हा परिषद शाळा असून या शाळांपैकी ज्या शाळांमध्ये सुविधा निर्मिती व सौंदर्यीकरण उपाययोजनांची आवश्यकता असेल त्याबाबत त्या त्या शाळांचे मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे कळवतील. त्यानुसार शाळा मुख्याध्यापकांनी दि.20 पर्यंत आपल्या शाळेत (शासन निर्णयात दिलेल्या 13 कामांच्या यादीनुसार) करावयाच्या कामांची यादी मुख्याध्यापकांनी दि.20 डिसेंबर पर्यंत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे पाठवावी. त्यानुसार दि. 25 पर्यंत गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी आणि तहसिलदार यांनी एकत्र बसून तालुक्यातील शाळांच्या विकासाचा आराखडा तयार करावा. त्यानुसार दि.25 ते 30 दरम्यान तालुकास्तरावर बैठका घेऊन नियोजन तयार करावे. प्रत्यक्ष जानेवारी 2025 मध्ये कामांना सुरुवात होईल असे नियोजन करावे. कामाच्या स्वरुपानुसार ते एप्रिल पर्यंत अथवा 2025 च्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवाती अगोदर पूर्ण करावे. या प्रमाणे जिल्हाधिकारी स्वामी यांनी कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. त्याचप्रमाणे एकीकडे शाळांमध्ये भौतिक सुविधांचा विकास होत असतांना शाळांमध्ये घडणारा विद्यार्थी हा गुणवत्ताधारक व संस्कारक्षम असावा, यासाठीही दशसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी येत्या नव्या वर्षात करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. त्यासाठी तालुकास्तरावर त्या त्या तालुक्यातील शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजीत करण्यात येईल. त्या कार्यशाळेतील प्रशिक्षणानंतर मुख्याध्यापकांनी आपापल्या विद्यालयात दशसुत्री कार्यक्रम राबवावा,असे निर्देश देण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow