गरजूंपर्यंत प्रभावीपणे लाभ पोहोचवावा - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

 0
गरजूंपर्यंत प्रभावीपणे लाभ पोहोचवावा - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

गरजुंपर्यंत प्रभावीपणे लाभ पोहोचवावा-

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14 (डि-24 न्यूज)

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रशासनाने गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिले .

 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू विजय सरवदे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रदीप भोगले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. 

 केंद्रशासनातर्फे पंतप्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना, जनधन योजना, दिव्यांगांसाठी सहाय्य, आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री, सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जातात. या योजना राबवत असताना जिल्हा प्रशासनातील प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी असून तसा विश्वास अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने त्यांना द्यावा, असे मंत्री आठवले यांनी सांगितले.

  बैठकीत माहिती देण्यात आली की, ग्रामीण भागात रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापैकी 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी बैठकीत दिली. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 6 हजार 163 घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण केले असून अजून 30 हजार घरकुलांची आवश्यकता असल्याचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

  जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार 15 लाभार्थी असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले. तर जनधन योजनेअंतर्गत 15 लाख 38 हजार लाभार्थ्यांनी बॅंक खाते उघडले आहे. तसेच मुद्रा योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी सांगितले. 

मंत्री आठवले यांनी यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांगांच्या आणि ज्येष्ठांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच वयोश्री आणि तीर्थ दर्शन योजनेची अंमलबजावणी, पोलीस प्रशासनामार्फत अनुसुचित जातींच्या संदर्भात झालेल्या गुन्हे व त्याचे तपासकार्य याबाबतची माहिती या बैठकीमध्ये सादर करण्यात आली. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना वेळेवर अनुदानाचा लाभ देण्याचे निर्देश यावेळी मंत्री आठवले यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow