"लखपती दिदी" च्या माध्यमातून मिळेल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

‘लखपती दिदी’च्या माध्यमातून मिळेल
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14 (डि-24 न्यूज)
केंद्र शासनाच्या ‘लखपती दिदी’ या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरणास बळ मिळणार आहे. तरी या योजनेच्या अंमलबजावणीस गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.
लखपती दिदी सुकाणू समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंदनसिंग राठोड, जिल्हा शिक्षणाधिकारी(योजना) अरुणा भूमकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पातळीवर करावी. यात महिला सुरक्षा, मुलींचा जन्मदर वाढवणे, त्याचप्रमाणे महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यवसाय वृद्धीसाठी समन्वय आवश्यक आहे. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा महिला बालविकास विभागामार्फत करण्यात यावे. ‘लखपती दिदी’ या योजनेअंतर्गत दिलेले उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करावे. आजीविका या पोर्टल वरील सर्व नोंदी अद्यावत कराव्या. लखपदी दिदी योजनेत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा. महिलांना भांडवल आणि बँकांचे सहकार्य, सूक्ष्म गुंतवणूक, उत्पादक गटांची स्थापना, आणि सेंद्रिय शेती गटाची स्थापना यास प्राधान्य देऊन विविध शासनाच्या योजनांची अंमलबजावणी एकत्रित करून महिलांचे आर्थिक उत्पन्न जास्तीत जास्त वाढावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?






