नववीच्या माजी विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने केले सपासप वार, हल्ल्यात शिक्षक गंभीर जख्मी
नववीच्या माजी विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने केले सपासप वार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- छावणीतील लिटिल फ्लॉवर या नामांकित इंग्रजी शाळेत चक्क नववीच्या माजी विद्यार्थ्यांने शिक्षकाच्या पोटात चाकू मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
हा विद्यार्थी 2023 मध्ये नववी कक्षेत अनुत्तीर्ण झाला होता. त्यानंतर सदरील विद्यार्थी शाळेत टिसी काढण्यासाठी आला असताना वर्गशिक्षकासोबत वाद झाला. त्यातूनच त्याने स्वतःकडे असलेला चाकू त्यांच्या पोटात खुपसला. यामध्ये शिक्षक विशाल फ्रान्सिस दुसिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक मानली जात आहे. हल्ला करणारा विद्यार्थी विधीसंघर्ष बालक असून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली आहे.
विद्यार्थ्याने केला हल्ला - शहरातील छावणी परिसरातील नामांकित 'लिटिल फ्लॉवर' शाळेत भरदुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील एका माजी विद्यार्थ्याने दाखला देण्याच्या कारणावरून विशाल फ्रान्सिस दुसिंग या शिक्षकावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात शिक्षक रक्ताच्या थारोळ्यात कोसळले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल फ्रान्सिस दुसिंग असे जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते लिटिल फ्लॉवर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ते शाळेत असताना, एक माजी विद्यार्थी तिथे आला. मुख्याध्यापकांना दाखला काढण्यासाठी मागणी केली, त्यावेळी मुख्याध्यापकांनी त्याच्या वर्गशिक्षकांना बोलावून घेतले. त्यावेळी विद्यार्थ्याने शिक्षकांशी वाद घालण्यास सुरुवात केळी, जुना वाद उकरून काढत हुज्जत घातली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या माजी विद्यार्थ्याने खिशातील धारदार चाकू काढून थेट शिक्षक दुसिंग यांच्यावर सपासप वार केले.
विद्यार्थ्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे शाळेत एकच खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी शिक्षक विशाल दुसिंग यांना शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडिओ शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या माजी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलीस करत आहेत. सदरील विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत असल्याची माहिती छावणी पोलिस ठाणे निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी दिली आहे.
What's Your Reaction?