पगार रोखणा-या घाटीच्या डिनवर गुन्हा दाखल करण्याची आयटकची मागणी...!

पगार रोखणाऱ्या घाटीच्या डीनवर गुन्हे दाखल करा - आयटकची मागणी !
छत्रपति संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 27(डि-24 न्यूज) मुद्दामहून पगार थकवण्याचे आदेश देऊन कामगार कायद्याचा भंग करणारे घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने सहाय्यक कामगार उपायुक्त कार्यालया समोर जोरदार निदर्शने करून केली.
याबाबत असे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी जानेवारी व फेब्रुवारी 2025 चा पगार स्वतः आदेश देऊन कोविड योद्धे असलेल्या कामगारांचे पगार थांबवण्याचे आदेश दिले या विरोधात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकने कामगार उपायुक्त कार्यालया समोर जोरदार निदर्शने केली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा , मुद्दामहुन पगार अडवणाऱ्या घाटीच्या डीनवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे , उपायुक्त साहेब डीनशी हातमिळवणी करून स्वतः च्या नातेवाईक पेशंटला व्ही आय पी ट्रीटमेंट घेणे बंद करा , कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांसाठी काम केलेच पाहिजे , आयटक जिंदाबाद इ घोषणांनी कामगार उपायुक्त परिसर दणाणून गेला. 10 - 11 हजार रुपयाच्या तोकड्या पगारात घाटीत 150 पेक्षा जास्त कामगार कसेबसे घर चालवतात. महिना मोठ्या मुश्कीलीने निघतो पगाराची आतुरतेने वाट पाहण्यात डोळ्यात प्राण येतात. आणि डॉ. सुक्रे क्रुरपणे दोन दोन महिने पगार थांबवण्याचे आदेश देतात त्यांची दया करू नका कायदया प्रमाणे गुन्हे दाखल करा असे आयटकच्या निवेदनात नमूद आहे. यावेळी सहाय्यक कामगार उपायुक्त कार्यालयातील पडीयाल यांनी निवेदन स्विकारले व तत्काळ डॉ. शिवाजी सुक्रे यांना फोन केला व सोमवारी दुपारी 12.30 वाजता बैठकीला हजर राहण्यास सांगितले. यावेळी कार्यालयात अनुपस्थित असलेले उपायुक्त राऊत यांच्याशी ॲड अभय टाकसाळ यांनी फोनवर संपर्क केला व कामगारांच्या व्यथा सांगितल्या. या निदर्शनात ॲड अभय टाकसाळ , अभिजीत बनसोडे , आतिश दांडगे , नंदाबाई हिवराळे , दिपक मगर , रोहीत बटुल्ले , बंटी खरात , अमीत भालेराव , छाया लोखंडे, श्रीकांत बनसोडे , श्रीयोग वाघमारे , प्रमीला रत्नपारखे , अंजूम शेख , शिला मूजमुले , कविता जोगदंडे यांच्या सह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
What's Your Reaction?






