पावसाळी पर्यटनाला बेफिकीरीचे ग्रहण, स्टंटबाजी, ट्रीपलसीट अन् धिंगाणा...!

 0
पावसाळी पर्यटनाला बेफिकीरीचे ग्रहण, स्टंटबाजी, ट्रीपलसीट अन् धिंगाणा...!

पावसाळी पर्यटनाला बेफिकीरीचे ग्रहण; स्टंटबाजी, ट्रिपल सीट अन् धिंगाणा

खवल्या डोंगरावरील हृदयद्रावक घटनेनंतर पर्यटनस्थळांवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवण्याची नागरिकांची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- पावसाळा सुरू होताच राज्यातील धरणे, घाट, धबधबे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. कुटुंबासह पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असले, तरी काही हौशी पर्यटकांकडून होणारी बेफिकिरी आणि धोकादायक स्टंटबाजी अपघातांना आमंत्रण देत आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनाला आता बेफिकीरीचे ग्रहण लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातील पडेगाव-मिटमिटा रोड, दौलताबाद घाट, म्हैसमाळ रोड, जटवाडा, रसूलपुरा, बीबी का मकबरा आदी ठिकाणी तरुणांकडून डोंगराच्या टोकावर जाऊन जीव धोक्यात घालून रील्स व फोटो काढण्याचे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून मोठ्या आवाजात गाणी लावत धिंगाणा घातला जातो. त्याचबरोबर ट्रिपल सीट प्रवास, भरधाव वाहनचालवणे, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, कर्णकर्कश सायलेंसरचा वापर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकारही सर्रास सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

खवल्या डोंगरावरील घटनेने धक्का...

याच पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी परिसरातील खवल्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसराला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन मोबाईल घेण्याच्या मागणीवरून कुटुंबीयांशी झालेल्या वादानंतर 19 वर्षीय कुणाल चांदगुडे हा सकाळी सुमारे 10 वाजता खवल्या डोंगरावर गेला होता. त्यानंतर त्याला खाली आणण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तास त्याला समजावून सांगण्याचे प्रयत्न करण्यात आले.

दुपारी सुमारे 1 वाजता त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे ( वय 48) यांनी मुलाला पकडून मागे ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी दोघांचाही तोल जाऊन ते दरीत कोसळल्याची माहिती आहे. ही घटना पाहून आई संगीता यांनाही मोठा धक्का बसला आणि त्यानंतर त्या देखील दरीत कोसळल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

पर्यटनस्थळांवर विशेष बंदोबस्ताची मागणी

पावसाळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. डोंगराच्या कड्यावर जाणे, धोकादायक ठिकाणी रील्स किंवा फोटो काढणे, वाहनांवर स्टंट करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे टाळण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकारांची गंभीर दखल घेऊन छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी पडेगाव-मिटमिटा रोड, दौलताबाद घाट, म्हैसमाळ, जटवाडा, रसूलपुरा तसेच अन्य पर्यटनस्थळांवर विशेष बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी होत आहे.

स्टंटबाजी, ट्रिपल सीट, भरधाव वाहनचालक, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

वेळीच प्रभावी कारवाई आणि जनजागृती झाल्यास धोकादायक प्रकारांना आळा बसून पावसाळी पर्यटन अधिक सुरक्षित करण्यास मदत होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow