पावसासाठी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची विशेष नमाज, दुवासाठी उठले हजारो हात...!

 0
पावसासाठी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची विशेष नमाज, दुवासाठी उठले हजारो हात...!

पावसासाठी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची विशेष नमाज; अश्रू अनावर करत अल्लाहकडे दुवा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ६ (डि-२४ न्यूज) : मराठवाड्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी शेतातील पिके वाळण्याच्या मार्गावर असून, आगामी काळात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. नदी, नाले आणि तलावांमधील पाणीसाठा खालावत असल्याने काही गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

या पार्श्वभूमीवर रविवारी (६ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता छावणी येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीने पावसासाठी विशेष नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली. यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी सहभागी होत पावसासाठी अल्लाहकडे विशेष दुवा केली. दुवा करताना अनेक भाविकांचे डोळे अश्रूंनी भरून आले.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जनरल सेक्रेटरी मौलाना उमरैन महफूज रहेमानी यांच्या इमामतीखाली मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अदा केली. नमाजनंतर खुतबा झाले. त्यानंतर उपस्थितांनी हात उंचावून पावसासाठी तसेच अल्लाहची रहमत मिळावी, अशी भावपूर्ण दुवा केली. “रहेमत की बारिश बरसा दो... गुनाह माफ कर दो...” अशा आशयाची आर्त विनवणी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी इमारत-ए-शरीया मराठवाड्याचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती मोईज कासमी, हाफीज सोहेल आणि हाफीज इक्बाल अन्सारी यांनी मार्गदर्शन केले. मौलाना उमरैन महफूज रहेमानी यांनी मुस्लिम बांधवांना वाईट सवयी सोडून धार्मिक शिकवणीचे पालन करण्याचे आवाहन केले. अल्लाहची इबादत करा, खोटे बोलू नका, पाच वेळची नमाज अदा करा, कुरआनमध्ये दिलेल्या शिकवणीवर अमल करा, नशेपासून दूर राहा आणि ज्यांचा जो हक्क आहे तो अदा करा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, ईदगाह कमिटीच्या वतीने नमाजासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पावसासाठी करण्यात येणारी ही विशेष नमाज आणि दुवा पुढील दोन दिवसही याच वेळी घेण्यात येणार असल्याची माहिती ईदगाह कमिटीच्या वतीने देण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow