पुढील तीन दिवस महत्वाचे काळजी घ्या, मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अलर्ट
 
                                पुढील 3 दिवस महत्त्वाचे, राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
पुणे, दि.19(डि-24 न्यूज) राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होताना दिसून येत आहे. आज दुपारी मराठवाडा व अनेक जिल्ह्यांत अवेळी पावसाने दानादान उडवली. पिकांचे घरांचे नुकसान झाले तर वीज पडून व्यक्ती व जनावरे मराठवाड्यात दगावली. राज्यातील सर्वच भागांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. 20 मे रोजी देखील राज्यभरात पावसाचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई व कोकण परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मुंबईतील किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सामान्यतः ढगाळ आकाश राहून जोरदार पावसाची शक्यता मुंबईत वर्तवली आहे. पुढील 3 दिवस त्याठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
पुण्यातील किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं. पुण्यात 20 मे रोजी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव व सिंधुदुर्ग यांसह पुण्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागांत अंशतः ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असून याठिकाणीही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये तापमान 28 ते 42 अंश सेल्सियस दरम्यान असू शकतं. येथे वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, वाशिम, यवतमाळ यासर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामानाच्या बदलत्या स्थितीमुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित करावा आणि विजांच्या गडगडाटाच्या वेळी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. राज्यात 20 मेपासून पुढील काही दिवस पावसाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. मान्सूनपूर्व वातावरण अधिक सक्रिय होऊन पावसाचा जोर अधिक वाढू शकतो, त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            