बच्चू कडू - इम्तियाज जलिल साथ साथ...

कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर चक्का जाम आंदोलनाला एमआयएमच्या जाहिर पाठींबा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) -
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यात 24 जुलै रोजी चक्का जाम आंदोलन करण्याचे पक्षाध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांनी निर्णय घेतला आहे. या चक्का जाम आंदोलनाला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी जाहिर पाठींबा देत असल्याचे पत्र बच्चू कडू यांना पाठवले आहे. या चक्का जाम आंदोलनात राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहे.
त्यांनी पत्रात म्हटले आहे राज्यातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, गरीब व वंचित घटकांच्या मुलभुत मागण्यांसाठी जे आंदोलन सुरु केले आहे त्यास माझा व एमआयएम पक्षाचा पूर्णपणे पाठींबा आहे. शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग व विधवांना 6 हजार अनुदान, शेतमालाला किमान आधारभूत किमतीच्या पलीकडे 20 टक्के प्रोत्साहन रक्कम, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मुद्यावर केंद्र व राज्य शासनाने ठोस निर्णय न घेतल्यामुळेच हे जन आंदोलन अपरिहार्य झाले आहे.
आपण सुरु करत असलेले हे आंदोलन लोकशाही मार्गाने जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी संघर्ष आहे. "गुरुकुंज मोजरी" येथून सुरु झालेला हा लढा आता संपूर्ण राज्यातील लोकांच्या भावना व हक्कांचे प्रतीक ठरतो आहे. शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी सुरु असलेल्या चक्का जाम आंदोलनाला पाठींबा देत आहे. सरकारने तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी आहे. या आंदोलनातील मागण्या केवळ राजकीय नसून तर त्या सामाजिक न्यायाशी निगडित आहेत. शासनाने दुर्लक्ष केले तर असंतोष व्यापक प्रमाणात उफाळून येईल यास शासनच जवाबदार असेल असा इशारा पत्रात दिला आहे.
What's Your Reaction?






