भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटीबध्द - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटीबद्ध-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुविधांचा आढावा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23 (डि-24 न्यूज) -श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. देशभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना चांगला अनुभव मिळावा, यासाठी घृष्णेश्वर मंदिर संस्थान आणि सर्व शासकीय विभागांनी सामन्यातून सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये आज ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) चंद्रहार ढोकणे, तहसीलदार सस्वरूप कंकाळ , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, पर्यटन विभागाचे सहायक संचालक संचालक विजय जाधव यांच्यासह महावितरण , प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भाविकांसाठी स्वच्छता, आरोग्य, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, सुलभ वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. मंदिरात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला जाईल. येथे भाविकांना आपत्कालीन आरोग्य सुविधा तसेच इतर मदतीसाठी मार्गदर्शन मिळेल. दिव्यांग, लहान मुले, महिला आणि वृद्ध भाविकांना दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मंदिर प्रशासनाने स्वयंसेवकांच्या मदतीने सुलभ दर्शनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
मंदिराच्या परिसरात विकले जाणारे खाद्यपदार्थ स्वच्छ आणि आरोग्यदायी असल्याची खात्री अन्न व औषध प्रशासन विभाग आणि ग्रामपंचायत विभागाने करावी. अनधिकृत किंवा अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. याबाबत संबंधित विभागाने जवाबदारीने काम करावे ,उपवासाच्या भगर, प्रसादाच्या खाद्यपदार्थातून भाविकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याबाबत कार्यवाही करावी.
गाभाऱ्यात स्वच्छता ठेवण्यासाठी पिंडीवर बेलपत्र आणि पांढऱ्या रंगाची धोत्रा फुले वाहण्याची परवानगी असेल. इतर कोणत्याही वृक्षाचे पान किंवा फुले अर्पण न करण्याचे आवाहन घृष्णेश्वर मंदिर विश्वस्तांनी केले आहे, जेणेकरून गाभाऱ्यातील स्वच्छता राखता येईल. मंदिर प्रशासनाला भाविकांना योग्य मार्गदर्शन करून दर्शनासाठी सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले. घृष्णेश्वर विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर नियोजन करून कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
What's Your Reaction?






