भाजपा नगरसेवकांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कधी चालवणार, इम्तियाज जलिल यांचा मनपा आयुक्तांना सवाल...!
भाजपच्या नगरसेवकांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कधी चालवणार, इम्तियाज जलिल यांचा मनपा आयुक्तांना सवाल....
मनपा आयुक्तांची भेट घेऊन कागदपत्रेही केली सादर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेने एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगाव येथील अनधिकृत 3 मालमत्तांवर बुधवारी पहाटे कारवाई केल्याने एमआयएम अक्रामक झाली आहे.
आज दुपारी 3 वाजता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन मनपात दाखल झाले. त्यांनी मनपा आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन भाजपचे नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांनी केलेले बांधकाम अनधिकृत असून, त्यासंदर्भात चौकशी अहवालही सादर झालेला आहे, या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी करणार बुलडोझर या मालमत्तांवर कधी चालणार असा प्रश्न उपस्थित केला. या दोन्ही नगरसेवकासंदर्भात दाखल तक्रारींची आणि बांधकामाची तपासणी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी त्यांना दिले.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांच्यासोबत गटनेते हाजी शेरखान, विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर सोबत एमआयएमचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आयुक्त अमोल येडगे यांच्या दालनात जावून त्यांची भेट घेत निवेदन व भाजप नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामांचे पुरावे सादर केले. मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्याची घाई कोणाच्या दबावाखाली केली, असा सवाल केला. या कारवाईला एमआयएमने विरोध केला नाही. अनधिकृत बांधकामे काढलेच पाहिजे. इतर भागातही अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत असे सांगत सत्ताधारी पक्षातील प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांचेही बांधकाम अनधिकृत आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग, निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रारीही दाखल केलेल्या आहेत. झोन कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी तसेच नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागाने चौकशी करून 30 मार्च 2026 रोजी अहवाल दिलेला आहे, त्यास आता दीड महिना उलटूनही कारवाई का केली नाही...? या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी करणार...? असा सवाल जलील यांनी केला. यावर आयुक्त अमोल येडगे म्हणाले, अनधिकृत बांधकाम करणा-या कोणत्याही व्यक्तीला पाठिशी घातले जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या दोन्ही नगरसेवकांच्या कागदपत्रांची तपासणी करून बांधकाम अनधिकृत असेल तर कारवाई निश्चीत होईल, असे आश्वासन आयुक्त येडगे यांनी जलील यांना दिले.
What's Your Reaction?