मध्यरात्री सरकारी रुग्णालयात अग्नितांडव, 3 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू, 36 चिमुकल्यांना वाचवले...!
मध्यरात्री सरकारी रुग्णालयात अग्नितांडव; 3 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू, 6 गंभीर, 36 चिमुकल्यांना वाचवले...
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NICU मध्ये पहाटे भीषण आग लागून तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून 36 बालकांना सुरक्षित बाहेर काढले.
अमरावती, दि.24(डि-24 न्यूज):- अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातून (डफरिन रुग्णालय) एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बाळांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या अचानक स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पहाटे 3:30 वाजता घडली दुर्घटना
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षात पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास अचानक व्हेंटिलेटरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटानंतर काही क्षणातच संपूर्ण कक्षात धुराचे लोट पसरले आणि आग भडकली. त्यावेळी या विभागात 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते.
कर्मचाऱ्यांची प्रसंगावधानता, 36 बालकांचे प्राण वाचले...
आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, परिचारिका (नर्सेस) आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी धुराच्या आणि आगीच्या लोटातून 36 नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढले. यापैकी गंभीर स्थिती असलेल्या 6 बालकांना तातडीने पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीन बाळांचा दुर्दैवी अंत...
कर्मचाऱ्यांनी प्राणांची बाजी लावून बालकांना बाहेर काढले, तरीही आगीच्या तीव्रतेमुळे 3 चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत बालकांच्या नातेवाइकांनी तीव्र आक्रोश केला असून संपूर्ण अमरावती शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमागचे निश्चित कारण आणि रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
What's Your Reaction?