महसूल अधिका-यांच्या आशिर्वादाने वर्ग-2 जमीनीचे वर्ग-1 करण्यासाठी गँग सक्रीय - इम्तियाज जलिल

महसुल अधिकार्यांच्या आशिर्वादाने वर्ग-2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रुपांतर करणारी गँग सक्रिय; महसुल मंत्र्यानी उच्चस्तरीय चौकशी करावी – मा.खासदार इम्तियाज जलील
मागील 6 वर्षात कोट्यावधींचा महसुल बुडविला...नांद्राबाद मध्ये 15 एकर जमिन हडपली... सरकारी चलनाचा वापर... सर्वच हिस्सेदार गब्बर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.25 (डि-24 न्यूज) शहर व जिल्ह्यात मागील सहा वर्षात वर्ग-2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये बेकायदेशीररित्या रूपांतर करुन संगणमताने कोटयावधीचा भ्रष्टाचार करणारे भुमाफिया, दलाल आणि संबंधित महसुल अधिकारी यांची उच्चस्तरीय चौकशी करुन फौजदारी कारवाई करावी आणि जमिनींची पुन:तपासणी करुन ती मूळ स्थितीत पुन:वर्गीकरण करण्याची मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
नांद्राबाद मधील गट क्र. 23 मधील जमीनीसह वर्ष 2019 पासुन ते आजपर्यंत वर्ग-1 जमीनीचे वर्ग-2 मध्ये बेकायदेशीर रुपांतर करण्याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र व उच्चस्तरीय समितीची स्थापना करावी. तसेच अशा दोषीं अधिकार्यांवर कायदेशीर व शिस्तभंगाच्या कारवाया करण्याची मागणी सुध्दा केली. याबाबतचे पत्र महसुल मंत्र्यासह मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सुध्दा दिले.
मा.खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्ग-2 (गैर-कृषिक / शासनाने दिलेल्या अटींना अधीन असलेल्या) जमिनींचे वर्ग-1 (खुली कृषिक जमीन) मध्ये बेकायदेशीररीत्या रूपांतर करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. हे रूपांतर अनेकदा बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती तसेच स्थानिक प्रशासनातील काही महसुल अधिकार्यांच्या संगनमताने केले जात असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे केवळ सरकारी महसुलाचा मोठा तोटा होत आहे, तर खर्या शेतकर्यांचे हक्कही डावलले जात आहेत. अशा कृतीमुळे ग्रामीण व शेतीप्रधान भागात असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे. जमीनीचे बेकायदेशिररित्या रुपांतर केल्याने शासनाच्या महसुलास मोठा फटका बसत असुन खर्या शेतकर्यांच्या हक्कांवर गदा येत आहे. या कारभारामुळे जमीन बाजारात अनधिकृत व्यवहार वाढत असुन नियोजनशून्य शहरीकरण व अतिक्रमणास चालना मिळत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे नमुद केले.
औरंगाबाद जिल्ह्यात एक टोळीच सक्रिय आहे जी अशा जमिनींचा शोध घेते आणि सरकारी चलनांचा वापर करून त्या स्वस्त दरात खरेदी करते. नंतर ही जमीन खाजगी कंपन्यांना आणि बिल्डरांना चढ्या दराने विकली जाते. हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांच्या संगनमताने घडत आहे. विशेष म्हणजे सर्वांना त्यांचा योग्य ''हिस्सा'' मिळतो. अलिकडेच दौलताबाद जवळील नंद्राबाद मधील गट क्र. 23 मध्ये अशाच प्रकारे 15 एकर जमीन हडप करण्यात आली. मागील अनेक काळापासून अशा किती तरी जमिनी बेकायदेशीररित्या हस्तांतरित झालेल्या आहेत यात मोठ्या अधिकार्यांचा सुध्दा समावेश आहे; हे खूप मोठे रॅकेट असल्याचे पत्रात नमुद केले.
What's Your Reaction?






