महापालिकेच्या वतीने महा कर समाधान शिबिर...!

 0
महापालिकेच्या वतीने महा कर समाधान शिबिर...!

औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे महा कर समाधान शिबीर... 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)

 महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशावरुन महानगरपालिकेतर्फे दिनांक 7,8 व 9 मार्च 2025 हे तीन दिवस महा कर समाधान शिबीर आयोजीत करण्यात येत आहे. महापालिकेचे कर थकविणा-या मालमत्ता धारकाविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 128 उप कलम 7 नुसार न्यायालयात दावा चालवण्याचा महानगरपालिकेस अधिकार आहे. त्यानुसार मागील महिन्यात रुपये एक लाख व त्यावर मालमत्ता कर थकित असलेल्या सुमारे 8200 मालमत्ताधारकांना महानगरपालिकेतर्फे विधी प्राधिकरण मार्फत कोर्टाच्या नोटीस पाठविल्या आहेत. या सर्व नागरीकांना दिनांक 22 मार्च 2025 रोजी जिल्हा न्यायालयात आयोजीत लोक अदालतीत त्यांच्या वकिलासह हजर राहणे बंधनकारक असणार आहे.

परंतु तत्पुर्वी काही मालमत्ता धारक त्यांना लागलेल्या कराबाबत आक्षेप अर्ज विधी प्राधिकरणात तसेच महानगरपालिकेकडे सादर करत आहेत. मालमत्ता धारकांनी या पुर्वी झोन कार्यालयात अनेकवेळा अर्ज करुनही त्यावर निर्णय झाला नसल्याचे निदर्शनास आले होते. अशा प्राप्त अर्जाचा तसेच इतर मालमत्ताधारकांना कराबाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांचे मत झाले. त्यामुळे त्यांनी अशा थकबाकीदार नागरीकांचे आक्षेप अर्ज व तक्रारी निकाली काढण्यासाठी महा कर समाधान शिबीर आयोजीत करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. त्यावर प्रशासनाने दिनांक 7,8 व 9 मार्च 2025 हे तीन दिवस महा कर समाधान शिबीर आयोजीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालमत्ता धारकांसाठी शिबीरा बाबत महत्वाचे मुद्दे...

विधी प्राधिकरण मार्फत कोर्टाच्या नोटीस मिळालेल्या मालमत्ता धारकांसाठी महा कर समाधान शिबीराचे आयोजन. हे कर समाधान शिबीर मनपा झोन 4 कार्यालय, 

टी. व्ही. सेंटर मैदान येथे दिनांक 7,8 व 9 मार्च 2025 हे तीन दिवस सकाळी 10.00 ते दुपारी 5 या वेळेत होईल.

करावर आक्षेप असलेल्या मालमत्ता धारकांनी त्यांना मिळालेली विधी प्राधिकरण कोर्ट नोटीस व आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला तक्रार अर्ज शिबीरात दाखल करावा.

  पुर्वी अर्ज दिला असल्यास त्याची प्रत व भरणा केलेल्या कराच्या पावत्या अर्जासोबत द्याव्यात.

आवश्यक व शक्य तेथे त्याच दिवशी अर्जदाराची सुनावणी, मालमत्तेची स्थळ पाहणी व मोजमाप केले जाईल. स्थळ पाहणी व मोजमापा ची आवश्यकता नसलेल्या प्रकरणात शक्यतो शिबीरात च निर्णय दिला जाईल.

निर्णयात अंतिम होणारा मालमत्ता कर नागरीकास त्याच ठिकाणी एकरकमी भरणा करावा लागेल.

 शिबीरातच कर भरण्याची सुविधा महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन दिली जाईल.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरीकांनी शिबीरास येताना आवश्यक ती काळजी घ्यावी.

असे उप आयुक्त 2 (कर संकलन) अपर्णा थेटे यांनी कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow