महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध आरोग्य उपक्रमांचे आयोजन...
महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध आरोग्य उपक्रमांचे आयोजन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)-महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार “महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त”महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत विविध प्रकारच्या मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले यामध्ये रक्तगट तपासणी, दुर्बिणीद्वारे स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड इत्यादी उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
• दि. 27/11/2025 पासून सुरु असलेल्या मोफत रक्तगट तपासणी शिबिरे आत्तापर्यंत 40 आरोग्य केंद्रे, व मनपा शाळा आणि मुख्यालयातील शिबिर यामध्ये एकूण 7,402 लाभार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली आहे व या शिबिराला जनतेचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता आरोग्य केंद्र निहाय या शिबिराची मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत केली आहे.
• त्याचबरोबर सिडको N-8 रुग्णालय येथे आज दि. 09/12/2025 रोजी मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करून 11 महिलांवर यशस्वीरित्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून आत्तापर्यंत मोफत लॅप्रोस्कोपिक शिबिरांच्या माध्यमातून एकूण 65 महिलांवर मोफत स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत आणि यापुढेही महानगरपालिकेच्या 5 रुग्णालयांमधून (सिडको एन -8, सिडको एन-11, कैसर कॉलनी, नेहरूनगर आणि सिल्क मिल कॉलनी रुग्णालय) नियमितपणे असेच मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
• तसेच आज दि. 09/12/2025 रोजी महानगरपालिकेच्या बन्सीलालनगर रुग्णालय येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान आणि निक्षय शिबिर आयोजित करण्यात आले व यामध्ये महानगरपालिकेचे सर्व मलेरिया कर्मचारी, सर्व सफाई कर्मचारी व आशा स्वयंसेविका अशा एकूण 138 लाभार्थ्यांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तसेच टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत एकूण 32 लाभार्थ्यांची एक्स-रे तपासणी करण्यात आली.
• यासोबतच महानगरपालिकेमध्ये कार्यरत एकूण 145 मलेरिया कर्मचा-यांचे संपूर्ण मेडिकल चेकअप करण्यात आले व त्यामध्ये फक्त 03 कर्मचा-यांना उच्च रक्तदाब असल्याचे निदर्शनास आले असून उर्वरित सर्व कर्मचारी सामान्य असल्याचे दिसून आले.
• प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत आत्तापर्यंत शहरातील एकूण 4,65,519 नागरिकांचे PMJAY Cards काढण्यात आले असून दि. 01/12/2025 ते दि. 23/12/2025 या कालावधीत आरोग्य केंद्र अंतर्गत वॉर्डनिहाय आयुष्यमान कार्ड काढणेबाबत मोहिम राबवण्यात येत आहे. मोहिमअंतर्गत 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत एकूण 10,496 कार्ड काढण्यात आले आहेत. महानगरपालिका टाऊन हॉल येथे दिव्यांग व्यक्तींची नवीन नोंदणी चालू आहे. त्यात सर्व दिव्यांगांचे आयुष्मान कार्डही काढून देण्यात येत आहेत. या अंतर्गत एकूण 1976 दिव्यांगांचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले. शहराच्या विविध भागात वास्तव्य असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी नजीकच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.
• नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करणे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना सर्व आरोग्य सेवेचा लाभ देणे, हा महानगरपालिकेच्या या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
What's Your Reaction?