चंपा चौकवर पाडायला आले की काय...धास्ती, परंतु केला सेंटर पाॅईंट काढण्यासाठी सर्वे...

 0
चंपा चौकवर पाडायला आले की काय...धास्ती, परंतु केला सेंटर पाॅईंट काढण्यासाठी सर्वे...

चंपा चौक रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वेला सुरवात...

शंभर फुट रुंद होणार रस्ता, जीन्सी चौकापासून वसाहतींचे मोठे जाळे...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) - रखडलेला चंपा चौक ते जालना रोड 30 मीटर(100 फुट) रुंद रस्ता करण्यासाठी आज सोमवारपासून महापालिकेने कार्यवाईला सुरुवात केली आहे. यावेळी मनपा अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि नागरी मित्र पथकातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभरात चंपा चौक, जिन्सी चौक, रेंगटीपुरा चौक आणि भवानीनगरपर्यंत सर्वे करण्यात आला. उद्या भवानीनगरपासून जालना रोडपर्यंतचा सर्वे पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या रस्त्यात सुमारे 900 ते 1 हजार मालमत्ता बाधित होणार असून, अतिक्रमण हटाव मोहिमेतील आतापर्यंतची सर्वात मोठी पाडापाडी ठरण्याची चिन्हे आहेत. 

सन 2001 च्या शहर विकास आराखड्यात दमडी महल (विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानापासून), चंपा चौक ते जालना रोडपर्यंत हा रस्ता 30 मीटर रुंदीचा आहे. मात्र रस्ता तयार करताना, दमडी महल ते चंपाचौकपर्यंत हा रस्ता 30 मीटरचा करण्यात आलेला आहे. तिथून पुढे मात्र रस्ता अरुंद झालेला असून, सध्या तो फक्त 9 मीटरचाच आहे. रेंगटीपुरा चौकापर्यंतच हा रस्ता असून, पुढे रस्ताच नाही. या चौकातून डावीकडून जिन्सी पोलीस ठाण्याकडे तर उजवीकडून मोंढा नाका रोड जाफर गेटकडे जाता येते. तर रेंगटीपुरा, भवानीनगरकडे जाण्यासाठी लहान गल्ल्या आहेत. चंपा चौकातून सर्वेला सुरूवात करण्यात आली. अलाइनमेंट ठरविण्यासाठी टोटल स्टेशन सर्वेच्या माध्यमातून सेंटर पॉइंट काढून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 15-15 मीटर रस्ता तयार करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी थांबून टोटल स्टेशन सर्वेसाठी मशीन लावण्यात आली, त्या त्या ठिकाणी काही वेळेसाठी रस्ता बंद करण्यात आला. यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नेमके काय चालले आहे, काय करत आहे, मार्किंग कधी होणार, रस्त्याचा सेंटर कसा काढणार, असे अनेक प्रश्नावर नागरिकांमध्ये चर्चा होत होती. 

रेंगटीपुऱ्यापासून पुढे सरळ जाणारा हा रस्ता भवानीनगर, दत्तनगर, दादा कॉलनी, कैलासनगरमार्गे जालना रोड असा होणार आहे. जालना रोडवर गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोरील महापालिकेच्या झोन कार्यालयासमोर हा रस्ता जालना रोडला जोडण्यात येईल. 

जिन्सी चौकापर्यंत अनेकांना दिला आहे टीडीआर अशी माहिती अधिका-यांनी दिली.

महापालिकेच्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे. लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, तोडायला आले आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये आहे. यापूर्वी महापालिकेने नोटिस न देता, पंचनामे न करताच लोकांची घरे तोडली आहेत. त्यानंतरही बाधित मालमत्ताधारकांना अद्यापही मोबदला दिलेला नाही. लोकांशी संवाद साधून, बाधितांना मोबदला देण्याची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर पाडापाडी केली पाहिजे. या भागात सुमारे 900 घरे आहेत नागरिकांना नोटिसा देवून, त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे तपासून, जागेचा मोबदला द्यावा, बेघर होत असलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, त्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. तर जिन्सीपर्यंत रस्त्यावरील बाधितांना यापूर्वीच महापालिकेने टीडीआर दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow