महापालिकेने जून अखेरपर्यंत 67.72 कोटी मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल...

 0
महापालिकेने जून अखेरपर्यंत 67.72 कोटी मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल...

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीत सातत्य; 30 जूनअखेर ₹67.72 कोटींची वसुली...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) -चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, दि. 30 जून 2026 अखेर मालमत्ता कर व पाणीपट्टी मिळून एकूण ₹67.72 कोटी इतकी वसुली करण्यात आली आहे. यावेळी प्रथमच जून महिन्यात धडक जप्ती कारवाई करून विविध मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या .

यामध्ये 64497 मालमत्ता धारकांनी मालमत्ता करापोटी ₹60.01 कोटी, तर 20000 जणांनी पाणीपट्टीपोटी ₹7.72 कोटी इतका भरणा आहे. गतवर्षी याच कालावधीत 60800 नागरिकांनी 59.95 कोटी मालमत्ता कर भरला होता .

दि. 30 जून 2026 रोजी एका दिवसात मालमत्ता करापोटी ₹2.24 कोटी, पाणीपट्टीपोटी ₹0.13 कोटी अशी एकूण ₹2.37 कोटी वसुली करण्यात आली. ही वसुली महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे.

झोननिहाय वसुलीचा आढावा घेतल्यास (Zone-5) ने ₹12.05 कोटी वसुलीसह प्रथम क्रमांक पटकावला असून, (Zone-7) ने ₹10.21 कोटी वसुलीसह द्वितीय, तर (Zone-9) ने ₹8.10 कोटी वसुलीसह तृतीय क्रमांक मिळविला आहे. (Zone-8) मध्ये ₹7.74 कोटी, (Zone-2) मध्ये ₹6.29 कोटी, (Zone-4) मध्ये ₹5.49 कोटी, (Zone-1) मध्ये ₹5.14 कोटी, (Zone-6) मध्ये ₹5.04 कोटी, (Zone-10) मध्ये ₹3.02 कोटी आणि (Zone-3) मध्ये ₹2.62 कोटी इतकी वसुली करण्यात आली.

गतवर्षीच्या तुलनेत वाढीच्या टक्केवारीत जे (Zone-10) ने 48.44 टक्के, तर सी (Zone-3) ने 43.05 टक्के वाढ नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच (Zone-1), (Zone-2) आणि (Zone-6) या झोनमध्येही अनुक्रमे 12.86 टक्के, 6.19 टक्के व 1.61 टक्के वाढ झाली आहे.

महानगरपालिका प्रशासनाकडून थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, करदात्यांना विविध माध्यमांतून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. करदात्यांनी थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीचा तात्काळ भरणा करून महानगरपालिकेच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे.

महानगरपालिका निर्धारित कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व झोन कार्यालयांच्या माध्यमातून विशेष नियोजन करून करवसुली मोहीम अधिक गतिमान करीत असून, आगामी काळात कर वसुलीमध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास महापौर समीर राजूरकर यांनी व्यक्त केला .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow