नारेगावात संतापाचा उद्रेक, दगड फेकला, सौम्य लाठीचार्ज, मार्कींग चुकीची केल्याचा आरोप

 0
नारेगावात संतापाचा उद्रेक, दगड फेकला, सौम्य लाठीचार्ज, मार्कींग चुकीची केल्याचा आरोप

नारेगावात मालमत्ताधारकाच्या संतापाचा उद्रेक, 

दगड फेकल्यानंतर सौम्य लाठीचार्ज...मार्कींग चुकीची केल्याचा आरोप, मालमत्ताधारकांची बैठक घेवून न्यायालयात जाणार असल्याचा नागरीकांचा इशारा मार्किंगवरून झालेल्या वादावादीनंतर तापले वातावरण, घराला जाण्यासाठी रस्त्यावरील पाय-या तोडल्याने मालमत्ताधारकाचा वाद, गैरसमज झाल्याने वाद उद्भवल्याचे वाहुळे यांनी सांगितले, पोलिसांनी परिस्थिती हाताळली...मोबाईलध्ये व्हिडीओ घेणा-याला मारहाण, नाव कळू शकले नाही...  

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - गेल्या काही महिन्यांपासून शांततेत व संयमाने सुरू असलेल्या अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे पाडण्याच्या मोहिमेला आज सोमवारी नारेगावात कारवाईला गालबोट लागले. मार्किंगवरून निर्माण झालेल्या वादानंतर संतप्त मालमत्ताधारकांनी पथकासोबत वाद घातला. घरात घुसण्यासाठी पाय-या तोडल्याने पथकावर मालमत्ताधारक संतप्त झाले. यानंतर वाद चिघळला. वादाचे व्हिडीओ घेणा-या एका युवकाला मारहाण करण्यात आली. त्याचे नाव कळू शकले नाही. पोलिस निरीक्षक कल्याणकर व माजी सैनिक परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असताना एकाने दगड मारल्याने परिस्थिती चिघळली. परिस्थिती हाताळण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्या इमारतीला जाण्यासाठी पर्यायी रस्ता आहे गैरसमजातून हा प्रकार झाला येथील मालमत्ताधारक सहकार्य करत आहे. कोणी कायदा हातात घेतला तर न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. रस्ता रुंदीकरण झाल्यास वाहतूकीचा प्रश्न नेहमीचा मिटेल. त्यांनी पुढे सांगितले दोन-तीन तरुण पथकावच्या अंगावरही धावून गेले, त्याचवेळी अज्ञातांनी दगडफेक केली. वाद घालणाऱ्या तरुणांना माजी सैनिकांनी ताब्यात घेतले, तर पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज करत नागरिकांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा फारसा परिणाम कारवाईवर झाला नाही. त्यानंतर पथकाने पाडापाडीची कारवाई पूर्ण करत रस्ता मोकळा केला. 

नारेगाव येथील जय भवानी चौक ते केंब्रिज-सावंगी बायपासवरील मुक्ताई चौक (मांडकी) या सुमारे दोन किमीचा रस्ता 30 मीटर रुंद करण्यासाठी सोमवारी महापालिकेच्या पथकाने अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वात कारवाईला सुरुवात झाली. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक आणि पोलीसांचा मोठा ताफा जेसीबी, टिप्पर आदी वाहने घेवून नारेगावात धडकला होता. महापालिकेच्या पथकाने आठ-पंधरा दिवसांपूर्वी या भागात टोटल स्टेशन सर्वेक्षण केले होते. मात्र नेमका सेंटर पॉइंट व टेप लावून मार्किंग करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केल्याने, पुन्हा मार्किंगचा निर्णय घेण्यात आला. दोन पथकांकडून दोन्ही बाजूंनी मार्किंगचे काम पूर्ण करून दुपारनंतर पाडापाडीला सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जय भवानी चौकापासून कारवाई सुरू केल्यानंतर पथक नारेगावच्या मध्यवस्तीत पोहोचले. दुपारी चार वाजेच्या सुमारास 3 मजली इमारतीजवळ मार्किंग करताना काही तरुणांनी वाद घातला. चुकीची कारवाई करू नका, असे म्हणत काही तरुणांनी नागरी मित्र पथकप्रमुख प्रमोद जाधव व इतरांशी वाद घातला, यावेळी तरुण त्यांच्या अंगावरही धावून गेले. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ते अधिक आक्रमकपणे अंगावर जावू लागले, त्यामुळे पोलीसांनी त्यांना लाठीचे फटके दिले, तेवढ्यात अज्ञाताने पोलीसांवर दगड भिरकावताच पोलीसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगविले.

मार्किंग करताना बेस काय धरला...नागरिकांच्या मनात प्रश्न...?

अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला विरोध नाही, आम्हांला वेळ द्यायला पाहिजे होता. अधिकृत घर असलेल्या नागरिकांना मोबदला देण्याबाबत मनपा आयुक्तांनी आश्वासन द्यायला पाहिजे होते. आता इथे सगळे अनधिकृत आहे, असे बोलून कसे चालणार....? स्वातंत्र्यापूर्वीपासूनच गावठाण आहे. मोबदला मिळाला पाहिजे. मार्किंग चुकीची होताना दिसत आहे. काही ठिकाणी 10 फूट इकडे, 10 फूट तिकडे सरकल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सेंटर पाँइंट काय धरला आहे, हे नागरिकांना समजलेले नाही. सॅटेलाइटनुसार पाँइंट धरला आहे. आज ते आले आणि कारवाई करायला लागले आहे. आम्ही आयुक्तांना भेटलो होतो, तेव्हा त्यांनी कुणावरही अन्याय करणार नाही, अधिकृत मालमत्ताधारकांना मोबदला देवू, असे आश्वासन दिले होते. नेमकी मार्किंग कशी करत आहे, बेस काय धरला आहे, हे नागरिकांना कळाले तर विरोध होणार नाही. याविषयावर आम्ही सविस्तर मनपा आयुक्तांशी बोलू. मालमत्ताधारकांची बैठक घेणार आहे त्यांना न्याय मिळवून देवू तसेच या अन्यायाविरोधात आम्ही न्यायालयात न्याय मागू, असे नागरिकांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow