महाराष्ट्रात 1.87 कोटी मतदारांचे गणना प्रपत्र अद्याप जमा नाही, मतदार यादी पुनरिक्षणाची अंतिम तारीख 17 ऑगस्ट
मतदार यादी पुनरिक्षणाची अंतिम मुदत 17 ऑगस्ट
राज्यातील 1.87 कोटी मतदारांचे गणना प्रपत्र अद्याप जमा नाही
मुंबई, दि.13(डि-24 न्यूज) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण सुरू आहे. या प्रक्रियेत मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्यात येत असून, ही प्रक्रिया 17 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण होणार आहे.
राज्यात एकूण 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार आहेत. त्यापैकी 7 कोटी 62 लाख 99 हजार 360 म्हणजेच 77.97 टक्के मतदारांचे गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहे.
तर 1 कोटी 87 लाख 56 हजार 231 म्हणजेच 19.17 टक्के मतदार ‘गणना प्रपत्र जमा न होणे’ (Uncollectable EF) या प्रवर्गात नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये गैरहजर 63 लाख 61 हजार 113, कायमस्वरूपी स्थलांतरित 71 लाख 95 हजार 388, मृत 33 लाख 94 हजार 53, अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार 16 लाख 62 हजार 121 आणि इतर प्रवर्गातील 1 लाख 43 हजार 556 मतदारांचा समावेश आहे.
दरम्यान, एकूण मतदारांपैकी 9 कोटी 50 लाख 55 हजार 591 (97.14 टक्के) मतदारांबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित 27 लाख 98 हजार 458 (2.86 टक्के) मतदारांबाबतची कार्यवाही अद्याप बाकी आहे.
Uncollectable EF प्रवर्गातील मतदारांच्या नावांच्या याद्या संबंधित BLO मार्फत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (BLA) उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरही या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
वास्तव्याच्या अनुषंगाने संबंधित मतदार किंवा मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी माहिती उपलब्ध करून दिल्यास BLO मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून संबंधित मतदारांचे गणना प्रपत्र 17 ऑगस्टपर्यंत भरून घेता येणार आहे. याबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना 12 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली असून, मतदार याद्यांची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अशी माहिती निवडणूक आयोगाने प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.
What's Your Reaction?