मोर्चा काढला तरीही रस्ता रुंदीकरण मोहीम थांबणार नाही - आयुक्त जी.श्रीकांत

 0
मोर्चा काढला तरीही रस्ता रुंदीकरण मोहीम थांबणार नाही - आयुक्त जी.श्रीकांत

किलेअर्क महापालिकेच्या बाधित सफाई कामगारांना मिळणार राहण्यासाठी मोफत फ्लॅट...

आयुक्तांनी केली किलेअर्क येथील वसाहतीत पाहणी...घरावर मोर्चा काढणा-यांना दिला इशारा, माझे कार्यालय भेटण्यासाठी सर्वांसाठी खुले. दबावाला बळी पडून रस्ता रुंदीकरण थांबणार नाही. बांधकाम परवानगी नसणारे मालमत्ता पाडली असल्याचे सांगितले. काही चुका झाले असतील तर सुधारणार, विना नोटीस मालमत्ता आता पाडणार नसल्याचे सांगितले... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - रस्ता रुंदीकरणात निवासी घरे जाणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या किलेअर्क येथील सारनाथ सोसायटी, नौबत दरवाजा वसाहतीला मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी बुधवारी भेट देवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तेथे राहत असलेल्या कुटुंबातील लहान बालकांशी आपुलकीने भेट घेतली. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. याठिकाणी बहुमजली इमारत बांधून त्यात वन बीएचके फ्लॅट मोफत देण्याचे आश्वासन आयुक्तांनी त्यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर दिले. याठिकाणी आदर्श प्रकल्प उभा राहिल्यास फाजलपुऱ्यातही याच धर्तीवर प्रकल्प उभारण्यात येईल. असेही आयुक्तांनी सांगितले.  

किलेअर्क परिसरात महापालिकेची जागा असून हि जागा 1980-82 मध्ये महापालिकेच्या सुमारे 30-35 सफाई कर्मचाऱ्यांना करारावर दिलेली आहे. मागील चाळीस-एक वर्षांपासून या ठिकाणी महापालिकेचे सफाई कामगार घर बांधून राहतात. आता या भागात सुमारे 80 कुटुंब वास्तव्यास आहेत. लहान बालके या घरातच मोठी झाली जागाही अपुरी पडत आहे. शहरात रस्ता रुंदीकरणात व्हीआयपी रोड रुंद करण्यात येणार आहे. त्यात रस्त्यालगतची घरे बाधित होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी मनपा आयुक्तांची भेट घेवून त्यांच्याकडे अडचणी मांडल्या होत्या. आज आयुक्त जी श्रीकांत यांनी या भागाला भेट दिली. यावेळी उपायुक्त नंदकिशोन भोंबे, माजी सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर आदींची उपस्थिती होती. यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या घरात जावून पाहणी केली. त्यांच्याशी संवाद साधला.

आयुक्त जी श्रीकांत म्हणाले की, हे कर्मचारी शहर स्वच्छ व सुंदर ठेवतात, मात्र ते फार हालाखीच्या परिस्थितीत राहतात. दुसऱ्यांना पी.एम. आवास योजनेत घरे मिळतात, पण या कर्मचाऱ्यांना ते पण नाही. रस्ता रुंदीकरणात बाधित कर्मचाऱ्यांना आम्हाला येथेच रहायचे आहे, याच जागेत घर द्यावे. अशी मागणी केली. त्यामुळे याठिकाणी उर्वरीत जागेवर बहुमजली इमारत बांधून 350 स्क्वे.फुट बांधकाम असलेला वन बीएचके फ्लॅट मोफत देण्यात येईल. सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावाचे घर मिळेल, यासाठी महापालिका प्रक्रिया करेल. 350 स्क्वे.फुटापेक्षा जास्त जागा हवी असेल तर पैसे द्यावे लागतील. असेही ते यावेळी म्हणाले.

आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढणा-यांना त्यांनी यावेळी इशारा दिला. माझे कार्यालय सर्वांसाठी खुले आहे वेळ घेऊन यावे व चर्चा करावी.

मोर्चा काढल्याने कारवाई थांबणार नाही

मालकीची जागा असेल तरी परवानगी घेवूनच बांधकाम केले पाहिजे. रस्ता रुंदीकरणासाठी जी काही पाच हजार बांधकामे तोडली, ती सर्व विना परवानगी बांधलेली होती. बेकायदेशीर बांधकाम असेल, तर ते बांधकाम मोर्चा काढला तरी वाचणार नाही, ते पाडणारच. शहराचा विकास झाला पाहिजे. बेघर झालेल्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. ज्यांची संपूर्ण मालमत्ता जात असेल, तर त्याचा मोबदला त्यांना दिला जाईल., असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

बळ देण्याचे बाप्पाला साकडे...

गत आठवड्यात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 26 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन व 900 मिमी योजनेचे लोकार्पण करण्यात आले आहे. येत्या 3 महिन्यात 200 एमएलडी पाणी देण्याचा आम्हाला मोठी कसरत करावी लागणार आहे. पाणीपुरवठा योजना निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी बळ द्यावे, बाप्पांना एवढेच साकडे आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक येत आहे, त्यासाठी शहर सज्ज ठेवायचे आहे, त्यासाठी प्रयत्न करत आहोत. शहराचे आधुनिक शहरात रुपांतर करण्यासाठी बळ द्यावे असे गणरायाकडे मागणे आहे, असे आयुक्त जी श्रीकांत म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow