युवक युवतींचे भवितव्य घडविण्यासाठी कटिबद्ध - कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा

 0
युवक युवतींचे भवितव्य घडविण्यासाठी कटिबद्ध - कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा

युवक- युवतींचे भवितव्य घडविण्यासाठी

कटीबद्ध- कौशल्य,रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- कौशल्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आयटीआय मध्ये आलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी हे आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्या आपुलकीनेच युवक युवतींचे भवितव्य घडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे,असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले. 

 देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आज श्री. लोढा यांच्या उपस्थितीत एकात्म मानवतावाद याविषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रेम खडकीकर यांनी ‘एकात्म मानवतावाद’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिष गर्दे, सदस्य अर्जून गायकवाड, उपसंचालक प्रदीप दुर्गे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजीत आल्टे, तसेच जग्वार फाऊंडेशनचे प्रसाद कंकाळ, सेंट ग्लोबेन्चे वैष्णव धार्मिक, टीएनएसच्या श्रीमती रुपा बोहरा, टोयोटा किर्लोस्करचे बी.एल.सुधाकर आदी उपस्थित होते.

 यावेळी तसेच जग्वार फाऊंडेशन, सेंट ग्लोबेन, टीएनएस, टोयोटा किर्लोस्कर यांनी शासकीय आयटीआय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणीबाबत केलेल्या सामंजस्य कराराचे विमोचन करण्यात आले. तसेच ईलेक्ट्रिक व्हेईकल दुरुस्तीच्या लघु कालावधी अभ्यासक्रमाचे उद्घाटन श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच अल्पमुदत पशिक्षण कार्यक्रमअंतर्गत बांधकाम कार्यशाळेचे उद्घाटनही करण्यात आले.

 विद्यार्थ्यांनी यावेळी सोलर रिपेअरिंग, स्किन केअर, ड्रेस मेंकिंग, ए आय, रोबोटिक्स, मोबाईल रिपेअरिंग इ. विविध अभ्यासक्रम हवेत असे मंत्री महोदयांसमोर सांगितले. यातील निम्मे अभ्यासक्रम लगेचच सुरु करण्यात येतील,असे आश्वासनही श्री. लोढा यांनी दिले.

 श्री. लोढा म्हणाले की, आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना हवे ते प्रशिक्षण सुरु करू. विद्यार्थ्यांना जे आवडतात, नवे क्षेत्र आव्हानात्मक वाटतात त्या क्षेत्राचे ज्ञान त्यांना व्हावे यासाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. त्यासाठी समाजातील त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्या. अशा मुलांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कर्ज देऊन स्वतःचा व्यवसाय उद्योग उभारुन देऊ. आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे अशा होतकरु युवक युवतींच्यापाठीशी शासन उभे राहील. कुटुंबातील मुलांप्रमाणे त्यांचे भवितव्य घडवू असेही श्री. लोढा यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow