शहरात गुन्हेगारीला "मोका " 14 टोळ्या उध्वस्त, 92 गुंड वर्षभरापासून गजाआड...!

 0
शहरात गुन्हेगारीला "मोका " 14 टोळ्या उध्वस्त, 92 गुंड वर्षभरापासून गजाआड...!

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीला 'मोका'; 14 टोळ्या उद्ध्वस्त, 92 सराईत गुंड वर्षभरापासून गजाआड

रेशन माफिया, गोवंश तस्कर आणि ड्रग्स माफियांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; 'एमपीडीए'च्या 17 कारवाया 100 टक्के यशस्वी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)-

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आणि संघटित टोळ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने मागील वर्षभरात धडक मोहीम राबवली आहे. समाजात दहशत निर्माण करणारे सराईत गुंड, रेशनचा काळाबाजार करणारे माफिया आणि गोवंश तस्करांवर थेट 'मोका' (MCOCA) आणि 'एमपीडीए' (MPDA) अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या आक्रमक कारवाईमुळे शहरातील तब्बल 92 कुख्यात गुन्हेगार मागील एक वर्षापासून कारागृहाची हवा खात असून, शहरातील संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

पोलीस आयुक्तांच्या थेट मार्गदर्शनाखाली शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली होती. या अंतर्गत सर्व कारवाया 100 टक्के यशस्वी (All detection successful) ठरल्या आहेत.

पोलिसी कारवाईची आकडेवारी एका दृष्टिक्षेपात:

एकूण दाखल 'मोका' (MCOCA): 14

एकूण 'एमपीडीए' (MPDA) कारवाया: 17

गुन्ह्यातील एकूण आरोपी: 120

अटक करण्यात आलेले आरोपी: 92

फरार आरोपींची संख्या: 28 (शोधमोहीम तीव्र)

विशिष्ट गुन्ह्यांवर विशेष फोकस

पोलिसांनी केवळ पारंपारिक गुन्हेगारांवरच कारवाई केली नाही, तर समाजाला पोखरणाऱ्या प्रवृत्तींनाही लक्ष्य केले आहे. दाखल करण्यात आलेल्या एकूण 14 'मोका' प्रकरणांपैकी 5 प्रकरणे अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची आहेत:

गोवंश हत्या आणि तस्करी: या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या टोळीवर 1 मोका लावला आहे.

रेशनचा काळाबाजार: गरिबांचे धान्य हडपणाऱ्या माफियांवर कठोर प्रहार करत 2 मोका कारवाया करण्यात आल्या आहेत.

अमली पदार्थ (Narcotics): युवा पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्स माफियांवर 1 मोका अंतर्गत कारवाई झाली आहे.

या विशेष कारवायां व्यतिरिक्त, उर्वरित 9 मोका कारवाया या समाजात खून, खंडणी, दहशत माजविणाऱ्या व शस्त्रास्त्रांचा धाक दाखवणाऱ्या सराईत 'हार्डकोर' गुन्हेगारांवर करण्यात आल्या आहेत. या सर्व कारवायांमुळे सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

गुन्हेगारांना थेट इशारा

या कारवाईच्या निमित्ताने पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

"शहरात यापुढे रेशनचा काळाबाजार, गोवंशाची हत्या, कत्तल किंवा अवैद्य वाहतूक आणि समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रवृत्तींवर यापुढेही 'मोका' आणि 'एमपीडीए' सारखीच कठोर व धडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांना माहिती द्यावी."

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow