रेशनचा माल साठा करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई...!

 0
रेशनचा माल साठा करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई...!

रेशनचा माल साठा करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि. 27(डि-24 न्यूज)- शासकीय रेशनचा माल बेकायदेशीररीत्या साठवून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या कलीम कुरेशी टोळीवर जिन्सी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रेशन धान्याच्या काळाबाजाराविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

दिनांक 12 जून 2026 रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गल्ली क्रमांक 5, रहमानिया कॉलनी, किराडपुरा येथील एम.आर. फंक्शन हॉलच्या खाली असलेल्या गाळ्यात मोठ्या प्रमाणात रेशनचा माल साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला.

छाप्यात शासनामार्फत सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत वितरित होणारे गहू, तांदूळ, मका, ज्वारी, साखर तसेच महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडीतील बालके, गर्भवती व स्तनदा मातांसाठी असलेला पोषण आहार मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले. या कारवाईत एकूण 17 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2026 आणि 182/2026 दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे :

कलीम छोटू कुरेशी (टोळीप्रमुख, फरार)

शेख अजहर शेख चाँद कुरेशी (फरार)

समीर बाबर कुरेशी (अटक)

फहाद लईक शेख (अटक)

फरदीन गणी पठाण (अटक)

आवेज कुरेशी

आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी तयार करून हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांमध्ये MCOCA कलम 3(1)(ii), 3(2) आणि 3(4) अंतर्गत कारवाई करण्यास 26 जून 2026 रोजी मंजुरी घेतली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-2) रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत आणि सहायक पोलीस आयुक्त (सिडको विभाग) मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस निरीक्षक गणेश तावडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर तसेच पोलीस कर्मचारी संदीप सानप, दीपाली सोनवणे आणि महादेव वणे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow