शहरात 2 लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस, उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी; 2 लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस, उद्दीष्ट 100 टक्के पूर्ण
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेच्या वतीने दि. 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. मोहिमेच्या पहिल्या दिवशी शहरातील 692 लसीकरण केंद्रांवरून 1 लाख 68 हजार 149 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला. त्यानंतर दि. 29 जून ते 3 जुलै या कालावधीत राबविण्यात आलेल्या घरभेट (IPPI) मोहिमेद्वारे आणखी 33 हजार 48 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. अशा प्रकारे एकूण 2 लाख 1 हजार 107 बालकांचे लसीकरण करून उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
या मोहिमेसाठी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद आणि आरोग्य सभापती सुनीता सोळुंके यांनी नागरिकांना आवाहन केले होते. नागरिकांनीही या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहिमेला यशस्वी केले.
महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त-2 कल्पिता पिंपळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे एसएमओ डॉ. मुजीब सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
महानगरपालिका हद्दीत एकूण 588 लसीकरण पथके कार्यरत होती. या पथकांनी घरोघरी भेटी देऊन शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे उर्वरित डोस दिले. तसेच बसस्थानके, रेल्वे स्थानक, विमानतळ, सिद्धार्थ उद्यान, मॉल्स, भाजी मंडई, आठवडी बाजार व शहरातील प्रमुख प्रवेशद्वार अशा 20 ट्रान्झिट पॉईंट्सवर 144 पथके कार्यरत होती. याशिवाय विटभट्ट्या, तांडे, पाडे, बांधकामांची ठिकाणे आदी भागांसाठी 24 मोबाईल पथकांनी विशेष मोहीम राबविली.
या मोहिमेसाठी सुमारे 2,050 मनुष्यबळ कार्यरत होते. शिवा ट्रस्ट औरंगाबाद नर्सिंग कॉलेज, डॉ. हेडगेवार नर्सिंग कॉलेज, कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज, डॉ. दहिफळे नर्सिंग कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज (घाटी व पडेगाव), एमआयटी नर्सिंग कॉलेज तसेच विविध नर्सिंग, मेडिकल कॉलेज व आरोग्य प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
घरभेट मोहिमेदरम्यान पावसाचे वातावरण असतानाही सर्व 588 पथकांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी विभाग, शिक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पोलिओ जनजागृती ऑडिओ, विविध वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, प्रिंट मीडिया व पत्रकार प्रतिनिधी यांनी व्यापक प्रसिद्धी देऊन महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळ, सिद्धार्थ उद्यान प्रशासन आणि महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागाने वाहतूक व्यवस्थेसाठी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण मोहिमेच्या नियोजन व अंमलबजावणीत नोडल अधिकारी तथा आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड, त्यांची संपूर्ण टीम, महानगरपालिकेचे सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी, एनयूएचएमचे अधिकारी-कर्मचारी तसेच मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण
झाली.
What's Your Reaction?